मांडकी खांबेवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ

 दोन बंद घरे फोडली; चांदीचे दागिने आणि रोकड लंपास!

 सावर्डे पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील पोफळी महावितरण वसाहतीतील घटना ताजी असतानाच मांडकी खांबेवाडी येथेही अज्ञात चोरट्यांनी दोन बंद घरांना लक्ष्य करत घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका घरातून चांदीचे विविध दागिने आणि रोख रक्कम, तर शेजारील दुसऱ्या घरातून रोख रक्कम चोरीला गेली आहे. या दोन्ही घरफोड्यांमध्ये एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मांडकी गावात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश काशिनाथ पवार (६५, सध्या रा. मालाड, मुंबई ; मूळ रा. मांडकी खांबेवाडी, ता. चिपळूण) यांचे मांडकी खांबेवाडी येथे घर आहे. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजल्यापासून ते ३० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कोयंडा हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले चांदीचे ताट, पेला, उंदराची मूर्ती, करंडा, दुर्वामाळ, निरंजन, जानवे, जास्वंदाचे फूल, मोदक आणि १० हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला.
याचदरम्यान, पवार यांच्या शेजारी राहणारे संतोष नथुराम निमुणकर यांच्या बंद घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप व कोयंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटातील रोख रक्कम चोरून नेली.या दोन्ही घरफोड्यांप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच परिसरातील दोन बंद घरे फोडण्यात आल्याने मांडकी खांबेवाडी परिसरात चोरीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त होत आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.