मुंबईतील कोकणवासीयांची श्रद्धा आणि आ. शेखर निकम यांचे आत्मीय नाते उजळले
चिपळूण (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून मुंबईतील विविध नवरात्र मंडळांना सदिच्छा भेट देत देवीचे दर्शन घेतले. प्रेमनगर स्पोर्ट क्लब नवरात्रोत्सव (चूनाभट्टी), स्वामी समर्थ नवरात्रोत्सव मंडळ (चेंबूर) आणि वैष्णव ग्रुप नवरात्रोत्सव (चेंबूर) येथे मनोभावे दर्शन घेत आ. निकम यांनी सर्वांसाठी सुख, शांती आणि आरोग्यदायी जीवनाची प्रार्थना केली.
या भेटीदरम्यान, मुंबईत स्थायिक झालेल्या चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील कोकणवासीयांशी आमदार निकम यांचा आत्मीय संवाद घडला. केवळ राजकीय नात्यापलीकडे जाऊन, त्यांनी प्रत्येकाशी आपुलकीने विचारपूस करत आप्तस्वकीयासारखे जिव्हाळ्याचे नाते जपले. गावातील विकासकामे, मुंबईतील परिस्थिती, आणि कोकणवासीयांच्या अडचणी, अपेक्षा यावर सविस्तर चर्चा करत त्यांनी कोकणाशी असलेली नाळ अधिक बळकट केली. या भेटीमुळे मुंबईतील कोकणवासीयांमध्ये उत्साहाचं आणि आपलेपणाचं वातावरण पसरलं. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गावापासून दूर असलेल्या कोकणवासीयांना आपल्या भागातील लोकप्रतिनिधीची भेट ही एक खास भेट ठरली.
यावेळी जिगणेश पाटील, चेतन शितप, संदेश चव्हाण, साहिल लांबाडे, प्रविण चव्हाण, अजित पवार, निखिल आग्रे, जावेद खलपे, अमोल साळवी, लोकेश शेट्टी, चिराग रामदिया, नन्मय सावंत, करण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. कोकणवासीयांच्या मनामनात आमदार शेखर निकम यांच्याविषयी असलेली आत्मीयता आणि विश्वास हीच त्यांच्याही कार्याची खरी पूंजी असल्याचे या भेटीतून दिसून आले.













