आय.सी.एस. च्या विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात सुवर्ण कामगिरी

खेड (प्रतिनिधी) – मुंबई विद्यापीठाच्या 58 व्या युवा महोत्सवात सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने शानदार सहभाग नोंदवला आहे. या महोत्सवात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यात कथालेखन, कथाकथन यांसारख्या प्रकारांत आय.सी.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष ठसा उमटवला.
कथालेखन (इंग्रजी) या स्पर्धेत तृतीय वर्ष वाणिज्य विभागातील कुमार सिद्धांत जागुष्टे यांनी मुंबई विद्यापीठ स्तरावर सुवर्णपदक प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव गौरवले. याचबरोबर कथालेखन (मराठी) प्रकारात तृतीय वर्ष संगणक शास्त्रातील कु. आदित्य मोहिते यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र मिळाले. तसेच कथाकथन (इंग्रजी) या स्पर्धेत तृतीय वर्ष वाणिज्य विभागातील कु. मरियम मुरुडकर यांचे उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना ग्रंथपाल डॉ. राजेश राजम आणि इंग्रजी विभागाच्या प्रा. अपूर्वा आयरे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. अमोल पाटील तसेच सर्व सांस्कृतिक विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. या यशामुळे आय.सी.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि सांस्कृतिक योगदानाला नवे पंख लागले असल्याचे महाविद्यालयीन सूत्रांनी सांगितले.