पती पत्नीसह दोन लहानग्यांचा समावेश
दापोलीत खळबळ
दापोली l प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील विसापूर येथील एकाच कुटुंबातील चौघेजण बेपत्ता झाल्याच्या प्रकाराने दापोलीत खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही सामावेश आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी दापोली पोलिसांनी एक पथक नियुक्त केले असुन त्यांचा शोध अद्यापही सुरु आहे. यामागे काही घरगुती भांडण किंवा अन्य काही घातपाताची परिस्थिती नाही ना ?दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 जुलै रोजी दापोली तालूक्यातील विसापूर गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर (34) हा दुपारी 2.30 च्या सुमारास त्याचा चुलत भाऊ सहदेव दत्ताराम भेलेकर यांच्यासोबत मंडणगड तालूक्यातील कुंबळे या ठिकाणी लाकडी पट्टी आणण्याकरीता जात आहे असे सांगून घरातून निघून गेला. तो अद्यापपर्यंत घरी आलेलाच नाही. दुकानात जातो असे सांगून निघून गेलेल्या भरत भेलकरचा कुटूंबासह नातेवाई मित्र मंडळीनी सर्वत्र शोध घेवून देखील तो कुठेच आढळून आला नाही. त्यामुळे दापोली पोलीस ठाण्यात भरत भेलेकर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तसेच भरत भेलकर बेपत्ता झाल्याच्या नेमके दुसऱ्याच दिवशी 3 जुलै रोजी भरत भेलेकर याची पत्नी सुगंधा भेलेकर ही सकाळी 9.30 च्या सुमारास मुलांना शाळेत सोडायला जाते असे सांगून आराध्य ( 7) व श्री (4) या आपल्या मुलांना मुगीज शाळा नंबर 1 या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासाठी घेवून घरातून निघून गेली तीसुध्दा परत सायंकाळपर्यंत घरी पुन्हा परतलीच नाही. आराध्य आणि श्री या लहानग्यांचा तसेच सुगंधा हिचा सगळीकडे शोध घेण्यात आला मात्र ते तिघे सुध्दा कुठेच सापडलेले नाहीत. तिच्या नातेवाईक व मित्रमंडळींकडेही चौकशी करण्यात आली मात्र त्यांचा कोठेच ठावठिकाणा लागलाच नाही. दूरध्वनीवरही संपर्क केला केला मात्र संपर्कच होत नसल्यामुळे अखेर सुगंधा भेलेकर बेपत्ता झाल्याची तर आराध्य व श्री या दोघा लहान बालकांचे अपहरण झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली असुन अज्ञात संशयीतांवर भा.द.वि.क. 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळया प्रकरणी घटनेतील प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे सहा्ययक पोलीस फौजदार मिलींद चव्हाण हे करत आहेत. तालुका पोलीस निरीक्षक श्री. अहिरे यांनी यासाठी खास एका पथकाची नियुक्ती केली आहे.