स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर :अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रौप्य महोत्सवी वर्षातच मोठे खिंडार पडले. पक्षाचे सुप्रीमो व संस्थापक म्हणून असलेल्या शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून त्यांच्या पुतण्याने हटवले. काकांना बाजूला सारून स्वत: अजित पवारच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून सुनील तटकरे यांची नियुक्ती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटविण्यासाठी देशपातळीवर विरोधी पक्षांची मोट बांधणीत पुढाकार घेणाऱ्या शरद पवारांना स्वत:चे पद आणि पक्षांवरील नियंत्रण वाचविण्यासाठी आता राज्यभर धावाधाव करावी लागत आहे. २ जुलैला असंतोषाचा मोठा स्फोट होऊन अजितदादांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे अशा राष्ट्रवादीच्या ताकदवान आठ जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेऊन काकांचे नेतृत्व भुईसपाट करण्याचा चंग बांधला.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यापासून ‘‘सन २०२४ मध्ये केंद्रात भाजपचेच सरकार येणार व मोदीच पंतप्रधान होणार’’ असे अजितदादा व प्रफुल्ल पटेल रोज सांगू लागले आहेत. अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या समर्थकांना साहेबांपेक्षा दादा अधिक जवळचे वाटू लागले आहेत. काका-पुतण्यातील व दादा-ताईंमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. मुंबईत मंत्रालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन दादांनी केले व तेथे शरद पवारांचा फोटो लावला आहे. राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचे फोटो मुंबईभर पोस्टर्सवर झळकत आहेत व त्यावरही काकांचे फोटो आहेत. आपल्यावर आरोप करायचे व पोस्टर्सवर आपलेच फोटो लावायचे म्हणून काका भडकलेत. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केलाय, त्यांनी माझे फोटो वापरू नयेत, असे फर्मान त्यांनी काढले आहे. माझा फोटो कोणी वापरावा हा माझा अधिकार आहे, असेही त्यांनी बंडखोरांना सुनावले आहे.
अजितदादा व नऊ मंत्र्यांनी २ जुलैला सरकारमध्ये जाण्यासाठी शपथ घेतली असली तरी त्या अगोदर म्हणजे ३० जूनला अजितदादांच्या देवगिरी या सरकारी निवासस्थानी आमदार-पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी व पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर अजित पवारांची निवड झाल्याचा ठराव संमत करण्यात आला. प्रदेशाध्यक्षपदावर जयंत पाटील यांच्या जागी सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली. नव्या नेमणुकांची यादी मंजुरीसाठी त्याच दिवशी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली. त्याच दिवशी अजितदादांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामाही विधानसभा अध्यक्षांकडे पाठवून दिला. काकांच्या साम्राज्यावर प्रहार करण्यापूर्वी कायदेशीर व घटनात्मक बाजू भक्कम राहील, याची अजितदादा, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांनी पुरेशी दक्षता घेतली. भाजपसारखा मोठा पक्ष आता या सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. शरद पवार व त्यांच्या लेकीला एकाकी पाडण्यासाठी साम, दाम, दंड अशी सर्व शक्ती बंडखोरांनी पणाला लावली आहे.
सोनिया गांधी या जन्माने विदेशी असल्याने त्यांना पंतप्रधान होता येणार नाही, अशी भूमिका शरद पवारांनी १९९९ मध्ये मांडली होती. सोनिया गांधी या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष व्हाव्यात म्हणून शरद पवारांनीच दहा जनपथवर जाऊन त्यांना विनंती केली होती. विदेशी जन्माच्या मुद्द्यावरून पवारांनी बंडाचा झेंडा फडकवल्यावर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले.
दि. १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून शरद पवारांनी काँग्रेस पक्षालाच आव्हान दिले. पण पंचवीस वर्षांत या राष्ट्रवादीला कधीही बहुमत मिळाले नाही. २८८ जागांच्या विधानसभेत पंचाहत्तर आमदारही कधी निवडून आले नाहीत. १९९९ मध्ये राष्ट्रवादीचे ५८ आमदार विजयी झाले. ज्या पक्षाने हकालपट्टी केली, त्या काँग्रेसबरोबर राज्यात आणि केंद्रात राष्ट्रवादीने सत्तेची फळे चाखली. २००४ मध्ये राज्यात राष्ट्रवादीचे ७१ आमदार निवडून आले, २००९ मध्ये ६२, २०१४ मध्ये ४१ आणि २०१९ मध्ये ५४ आमदार निवडून आले. सन २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला फारसे भवितव्य दिसत नाही, याची खात्री पटल्यामुळेच अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे हे ४० आमदारांची फौज घेऊन भाजपसोबत आले आहेत.
सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदावर नियुक्ती झाल्यावर अजितदादांच्या नेतृत्वाखाली बंडखोरांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय पक्का केला. स्वत: शरद पवार हे भाजपबरोबर जाण्यासाठी वेळोवेळी कशी चर्चा करीत होते, याचा गौप्यस्फोट अजितदादा व प्रल्ल्ल पटेलांनी करून काकांच्या दुटप्पीपणाचा पाढा वाचला.
सन २०२४ मध्ये लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी मुंबईसह राज्यातील अकरा महापालिकांच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे. एक वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठे बंड झाले. ठाकरे यांना पक्षाचे नाव व चिन्ह गमवावे लागले. सत्ता गेलीच, मुख्यमंत्रीपदी गेले. ठाकरे यांच्या पक्षातून अजूनही कोणी ना कोणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतच आहे. उबाठाची वाट लागली आणि तीच पाळी काकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीवर आली आहे. गेल्या वर्षी जून-जुलै महिन्यात जी भाषणे एकनाथ शिंदे हे ठाकरे यांच्या विरोधात करीत होते, तशीच भाषणे आता अजितदादा व प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या विरोधात करीत आहेत. एका वर्षात दोन मोठे प्रादेशिक पक्ष खिळखिळे झाले व त्यांचे दिग्गज नेते, आमदार, खासदार मोठ्या संख्येने भाजपसोबत नांदायला आले. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात विरोधी पक्ष शोधावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. काँग्रेसकडे राज्य पातळीवरील तगडा नेता नाही. उबाठा सेना, तर दिशाहीन असून सैरभैर झाली आहे. शरद पवार हे ‘ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ’, असे सांगत बंडखोरांच्या मतदारसंघातून फिरत आहेत. सर्व बंडखोरांचा येत्या निवडणुकीत पराभव होणार, अशी ते भविष्यवाणी उच्चारत आहेत. आमची कधी युती झाली नाही. पण भाजपबरोबर चर्चा केल्याची कबुली देण्याची त्यांच्यावर पाळी आली आहे. इकडे अजितदादा आपल्यावर काकांनी कसा अन्याय केला याचे पाढे वाचत आहेत, तर स्वत: पवार हे आपण सुप्रियावर अनेकदा अन्याय केला असे म्हणत आहेत. सुप्रिया दादांवर भडकल्या असून आपल्या बापाचा नाद करायचा नाय, अशी धमकी त्यांनी दिली आहे.
काकांनी आमच्या मतदारसंघात सभा घेतल्या, तर आपण तिथे जाऊन उत्तर देणारी सभा घेऊ, असे पुतण्याने बजावले आहे. शिवसेनेबरोबर सरकारमध्ये बसू शकतो, मग भाजपबरोबर का नाही, असा प्रश्न पुतण्याने काकांना विचारला आहे. काका विरुद्ध पुतण्या आणि ताई विरुद्ध दादा अशा राजकीय संघर्षाने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.
देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचारी पक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करीत होते. अजितदादांची जागा जेलमध्ये असेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. मग असे काय घडले की दादांना सरकारमध्ये सन्मानाने सामावून घेतले गेले? सत्तेत वाटा मिळावा म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे. ज्यांनी शिदोरी बरोबर घेऊन पक्षाच्या प्रचारासाठी वणवण केली, त्या भाजप कार्यकर्त्यांना काय वाटते हे कोणी तरी जाणून घेते काय? मंत्रिमंडळ विस्तारात आज ना उद्या म्हणे काँग्रेस येणार असेल, तर विधानसभेतील सर्वाधिक १०६ आमदार असलेल्या भाजपचे काय? शिवसेना व राष्ट्रवादी यांना सत्तेत वाटा देऊन भाजपची ताकद वाढणार आहे का? मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या आमदारांचे भविष्य काय? कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे, असे भाजपचे नेते सांगत असतात, मग अन्य पक्षांतून आलेल्यांना लाल गालिचे का घातले जातात? अगोदर मातोश्रीची व आता सिल्व्हर ओकची जिरविण्याच्या नादात पक्षाच्या निष्ठावंतांची तर जिरणार नाही ना? अशा प्रश्नांची मालिका रोज वाढत आहे.
गेल्या सहा दशकांत ज्यांनी सर्वच पक्षांतील बड्या नेत्यांना सत्तासंघर्षात गुंतवून ठेवले, त्या काकांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचे काम बंडखोरांनी केले. ‘उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशालीʼ’ असे म्हणण्याची पाळी वयाच्या ८३व्या वर्षी काकांवर आली….