खेडमध्ये ४ नवीन मंडळ अधिकारी नियुक्त  

 

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्याच्या महसूल विभागात नव्याने नियुक्ती देण्यात आलेल्या मंडळ अधिकाऱ्यांचे स्वागत खेडच्या उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसिलदार सुधीर सोनावणे, नायब तहसिलदार लक्ष्मीकांत सिनकर उपस्थित होते.

तालुक्यात चार नवीन मंडळ अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याने अतिरिक्त कारभार पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचा कामाचा ताण कमी झाला आहे. तालुक्यात खेड, आंबवली, भरणे, शिर्शी, लवेल, धामणंद व कुळवंडी अशी जुनी सात मंडळ अधिकारी कार्यालये कार्यरत होती मात्र वाढती लोकसंख्या आणि कामाचा आवाका लक्षात घेत नवीन चार मंडळ अधिकारी कार्यालय मंजूर झाली होती.

या कार्यालयासाठी यावर्षी नवीन अधिकारी नेण्यात आले आहेत.. यामध्ये चिंचघर मंडळ अधिकारी म्हणून संतोष उतेकर, धामणदेवी मंडळ अधिकारी म्हणून योगेश बना , भोस्ते मंडळ अधिकारी म्हणून संतोष भोईर तर तळे मंडळ अधिकारी म्हणून अर्चना लाकडे याना तलाठी संवर्गातून पदोन्नतीने मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुक्यात ६० तलाठी कार्यालय तर ११ मंडळ अधिकारी कार्यालय असून यांच्या मार्फत ग्रामीण भागात महसूल प्रशासन कारभार पाहते. तालुक्यात अर्चना लाकडे यांना पहिल्यांदाच एक महिला मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. यावेळी अनिल कुळे, उमाकांत देशमुख, प्रमोद लाड, एकनाथ बावीस्कर, सुनील कदम, राजाराम घुले, तलाठी संघाचे अध्यक्ष उमेश भोसले, दिलीप ढगे, स्पंदन क्षीरसागर, अंजली जाधव, निता कांबळे आदी मंडळ अधिकारी व तलाठी संवर्गातील कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन आंबवलीचे मंडळ अधिकारी राकेश खेडेकर यांनी केले.