विद्यार्थ्यांचा प्राचीन नाण्यांच्या इतिहासाशी थेट संवाद

‘गोष्ट नाण्यांची’ – पॉडकास्ट मुलाखत

रत्नागिरी – रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय व गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीच्या इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळाच्या वतीने ‘गोष्ट नाण्यांची’ या विषयावर गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी पॉडकास्ट स्वरूपात मुलाखत आयोजित करण्यात आली.

मुलाखतकार म्हणून कु. जान्हवी जोशी हिने काम पाहिले. या मुलाखतीत श्री. चिन्मय बेर्डे यांनी प्राचीन नाण्यांचा इतिहास, संशोधन व अभ्यास याबाबत रोचक माहिती दिली. विविध कालखंडातील नाण्यांमधून राजकीय, सामाजिक व आर्थिक घडामोडींचा मागोवा घेता येतो, याचे उत्कृष्ट विवेचन त्यांनी केले. त्यांच्या संग्रहात सध्या भारतातील व जगभरातील ५००० नाणी व ३०० नोटा असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ‘शिवराई’ या नाण्याला विशेष महत्त्व आहे, असे त्यांनी सांगितले.

पॉडकास्टच्या स्वरूपात कार्यक्रम झाल्याने विद्यार्थी-शिक्षकांनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमप्रसंगी कला शाखेचे विभागप्रमुख प्रा. वैभव कानिटकर, वाणिज्य शाखेच्या विभागप्रमुख प्रा. शिल्पा तारगावकर, मंडळाचे समन्वयक प्रा. निनाद तेंडुलकर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य प्रा. दिलीप जाधव, प्रा. दत्तात्रय माळवदे, प्रा. अन्वी कोळंबेकर, प्रा. अपर्णा तगारे व कु. जान्हवी जोशी यांनी मेहनत घेतली. उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी व पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या.