खालची देवली येथे मगर दिसून आल्याने खळबळ

वनविभाग व रेस्क्यू टीमने अथक प्रयत्नांती मगरीला पकडले

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील खालची देवली येथील साया बांध पुला खाली मंगळवारी साडेपाच फूट लांब मगर ग्रामस्थांना दिसून आली आणि एकच खळबळ उडाली. मगरीच्या दर्शना मुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वन विभाग व रेस्क्यू टीमच्या मदतीने मगरीला पकडण्यात यश आले.

दरम्यान, ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळाल्या नंतर वन विभागाची टीम आणि कोकण वाईल्ड लाईफ रेक्यू फोरमची टीम खालची देवली येथे दाखल झाली. ग्रामस्थ आणि नागरिकांच्या मदतीने टीम रेस्क्यू ऑपरेशन मध्ये गुंतली होती. वन विभागा कडून पुलाच्या तोंडाशी जाळे लावण्यात आले होते. रेस्क्यु ऑपरेशन पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थ, महिला, शाळकरी मुलांनी गर्दी केली होती.

पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांसह वन विभागाचे वनपाल अनिल राठोड, वन रक्षक संजीव जाधव, वन कर्मचारी अनिल परब, राहुल मयेकर, कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमचे अध्यक्ष अनिल गावडे, संजय कुमार कुपकर, शुभम फाटक, दर्शन वेंगुर्लेकर, धर्माजी तांडेल, वैभव खोबरेकर, वैभव आंबरूसकर आदी या मोहिमेत सहभागी झाले होते.

यावेळी मोठी गर्दी झाली. तब्बल चार तास मगर जाळ्यात पकडण्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. अथक प्रयत्न करूनही मगर जाळ्यात येत नव्हती. वनविभागा कडून शेवटी शर्थीचे प्रयत्न केल्या नंतर मगर जाळ्यात सापडली आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.