कुवळे गावच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला मिळाला मान
शिरगांव, (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील कुवळे गावामध्ये बचत गटाच्या माध्यमातून समाजसेवेचे काम प्रभावी पद्धतीने करत असलेल्या अक्षता गुरुनाथ लाड यांची कुवळे–रेंबवली गावच्या म. गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड नुकत्याच कुवळे – रेंबवली ग्रामपंचायत येथे संपन्न झालेल्या ग्रामसभेत झाली. ही निवड कुवळे ग्रामपंचायतच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला मिळालेला मान म्हणून विशेष ठरली आहे.
सरपंच सुभाष कदम यांनी यावेळी व्यक्त केले की, अक्षता लाड यांच्या निवडीमुळे गावातील तंटे चांगल्या पद्धतीने मिटवले जातील. सभेत उपसरपंच सुहास राणे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी संदीप पोवार , शाळांचे मुख्याध्यापक तसेच गावाचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीमुळे अक्षता लाड यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. कुवळे गावाने एका महिलेला तंटामुक्ती अध्यक्ष पद देऊन दिलेला हा सन्मान गावाच्या सामाजिक प्रगतीसाठी आदर्श ठरतो. अक्षता लाड यांना मिळालेला सन्मान नवरात्रीच्या स्त्री शक्तीच्या स्वरूपातील सन्मानाचे प्रतीक मानला जातो. गावाने इतरांच्या समोर ठेवलेला हा आदर्श आहे, जिथे महिलेला नेतृत्वाची जबाबदारी दिली गेली आणि समाजातील तंटे मिटवण्यास योगदान मिळाले.
बहुतेक देवगड तालुक्यात प्रथमच एका महिलेला हा मान मिळाला असावा.











