रत्नागिरी BREAKING : खारेघाट रोडवरील अपना फर्निचरला भीषण आग

अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ

रत्नागिरी :

शहरातील खरेघाट रोडवर असलेल्या अपना फर्निचर या दुकानाला आज (२ ऑक्टोबर) दुपारी सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. काही मिनिटांतच दुकानातून धुराचे प्रचंड लोट बाहेर येऊ लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या आगीत दुकानातील लाकडी व इतर फर्निचर साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. वाहनचालक सलीम चंदावाले यांच्यासह कर्मचारी नरेश मोहिते, अमोल चवेकर आणि अनिश्चित तोडणकर यांनी तातडीने धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांचे समन्वयित काम आणि धाडसामुळे अवघ्या काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, “आग लागल्यानंतर काही मिनिटांतच दुकानातून ज्वाळा बाहेर दिसू लागल्या. संपूर्ण परिसर धुराने व्यापला होता. आम्हाला भीती वाटत होती की आग शेजारच्या दुकानांपर्यंत पोहोचेल, पण अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.”

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुकानातील मोठ्या प्रमाणावर लाकडी सामान असल्यामुळे आग वेगाने पसरली. मात्र वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे ती फैलावली नाही. त्याचबरोबर शेजारील दुकानदारांनीही तात्काळ जागेवरून साहित्य बाहेर काढून मदत केली.

 

या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून प्राथमिक अंदाजानुसार लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. आगीचे कारण आणि नेमके नुकसान किती झाले याचा तपास सुरू असून, याबाबतचा अधिकृत अहवाल लवकरच सादर केला जाईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.