लांजा शाळा नं. ५ येथे पार पडले ० ते १८ वयोगटातील बालकांसाठी दिव्यांगत्व निदान शिबिर 

१८५ बालकांची तपासणी करून यु. डी.आयडी कार्डचे वितरण 

लांजा (प्रतिनिधी) लांजा शाळा नं. ५ येथे नुकतेच ० ते १८ वयोगटातील बालकांसाठी दिव्यांगत्व निदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात १८५ बालकांची तपासणी करून यु. डी.आयडी कार्डचे वितरण करण्यात आले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि समग्र शिक्षा समावेशित शिक्षण जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने या दिव्यांगत्व निदान शिबिराचे आयोजन न्याय समिती उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बौद्धिक, शारीरिक, विकासात्मक दिव्यांगत्व असलेल्या ० ते १८ वयोगटातील एकूण १८५ बालकांची युनिक डिसॅबिलिटी कार्ड UDID कार्ड करिता तपासणी करण्यात येऊन दिव्यांगत्व प्रकारचे निदान करून यु. डी. आयडी कार्ड वितरित करण्यात आली .जेणेकरून या बालकांना आवश्यक व गरजेनुसार सहाय्यक साधने व इतर शैक्षणिक सुविधा देण्यात येतील.

तसेच आयुष्यमान भारत कार्ड देखील विद्यार्थ्यांचे काढण्यात आली. सदर शिबिरासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, तालुका दिवाणी न्यायाधीश श्रीमती स्नेहल जोशी, गटविकास अधिकारी पंचायत समिती लांजा हिंदुराव गिरी,तालुका कृषी अधिकारी संतोष म्हेञे, उपशिक्षणाधिकारी श्रीम. सुनीता शिरभाते, समग्र शिक्षा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रवींद्र कांबळे, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत पावसकर,पंचायत समिती लांजा अधिकक्षक श्री.आंबेकर, श्री.कुरणे, विस्तारअधिकारी समृद्धी खडपे ,प्रकल्प संचालक दिव्यांग पुनर्वसन रत्नागिरी श्रीमती सुरेखा पाथरे, माजी मुख्याध्यापक मूकबधिर विद्यालय रत्नागिरी अरुण फाटक,विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे,लांजा नंबर ५ चे मुख्याध्यापक विश्वनाथ सुर्वे,कन्या केंद्राचे केंद्रप्रमुख विजय विश्वासराव, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विशेष शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशाताई, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते.

सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत पावसकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित जाधव यांनी केले. या शिबिरामध्ये दिव्यांग बालकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्रीमती वैदेही रानडे तसेच तालुका दिवाणी न्यायाधीश लांजा श्रीमती स्नेहल जोशी यांनी दिव्यांग विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

तसेच दिव्यांग बालकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. या स्टॉलच्या माध्यमातून राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेली ‘अंधांसाठी कॅप’ या उपकरण संदर्भात सादरीकरण प्रियंवदा शेट्ये हिने व्हिडिओच्या माध्यमातून केले. तसेच या स्टॉलच्या माध्यमातून सौ. संजना वारंग यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांकडून टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवून त्याचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञ डॉक्टर, ग्रामीण रुग्णालय लांजा वैद्यकीय अधीक्षक व तज्ज्ञ डॉक्टर, तहसील विभाग अधिकारी व कर्मचारी, पंचायत समिती लांजा अधिकारी व कर्मचारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी व कर्मचारी, समग्र शिक्षा अभियानातील अधिकारी व कर्मचारी, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,शिक्षक, विशेष शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली व त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.