सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक समीर रमाकांत परब यांची निवड झाली आहे. परब यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील सर्व स्तरातील शिक्षकांनी समाधान व्यक्त केले असून पतपेढीचे नेतृत्व आता एका सक्षम आणि संघर्षशील शिक्षकाच्या हाती आल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे.
श्री. समीर परब हे दक्षिण कोकण कृषी समाज मंडळातर्फे चालवल्या जाणाऱ्या माध्यमिक विद्यालय, झोळंबे हायस्कूल येथे सहाय्यक शिक्षक म्हणून आणि हिंदी विषयाचे ज्येष्ठ अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते मूळचे मळगाव येथील रहिवासी आहेत.
समीर परब यांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि सातत्यपूर्ण कार्यामुळे शिक्षकवर्गात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक वर्षांपासून ते सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतपेढीत दोडामार्ग तालुक्याचे संचालक म्हणून निवडून येत आहेत. सध्या ते दोडामार्ग तालुक्यातून जिल्हा खुला प्रवर्गातून निवडून आलेले प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत.
शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा सचिव म्हणूनही त्यांनी यापूर्वी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील प्रत्येक शिक्षकाच्या अडीअडचणीला धावून जाणारे आणि मदतीसाठी तत्पर असलेले नेतृत्व म्हणून समीर परब यांची प्रतिमा आहे.
समीर परब यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाहक संजय वेतोरेकर, चौकेकर सर, तसेच शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत डी. चव्हाण सर आणि मुख्यध्यापक नाईक सर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.













