गवारेड्याच्या धडकेत मृत पावलेल्या स्वप्नील पेडामकर या तरूणाच्या कुटुंबाला वनविभागातर्फे १० लाखांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द

देवरूख (प्रतिनिधी):

देवरूख-रत्नागिरी मार्गावरील आंबव येथे गवारेड्याच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या साडवली सह्याद्रीनगर येथील स्वप्नील पेडामकर या तरूणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर पेडामकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. वनविभागातर्फे पेडामकर कुटुंबाला १० लाख रुपयांचा शासकीय आर्थिक मदतीचा धनादेश आज बुधवारी सुपूर्द करण्यात आला आहे. या मदतीमुळे पेडामकर कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

स्वप्नील पेडामकर कामानिमित्त आपल्या ताब्यातील मोटारसायकलवरून देवरूखहून रत्नागिरीकडे जात असताना आंबव येथे सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलातून गवारेडा धावत रस्त्यावर आला व या गव्याची मोटारसायकलला धडक बसली. गव्याच्या जोरदार धडकेत रस्त्यावर फेकल्या गेल्याने स्वप्नीलच्या डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी त्याला रत्नागिरी येथे एका खाजगी रूग्णलयात हलवण्यात आले होते. यानंतर त्याच्यावर डेरवण येथील रूग्णालयात अधिक उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर पीडित पेडामकर कुटुंबाला लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आमदार किरण सामंत व आमदार शेखर निकम या लोकप्रतिनिधींसह स्थानिक सह्याद्रीनगर मित्रमंडळाने विशेष पाठपुरावा केला होता.

सह्याद्रीनगर मित्रमंडळानेअत्यंत संवेदनशील पाऊल उचलत आपला पारंपरिक दहीहंडी उत्सव रद्द करत दहीहंडीचा जमा झालेला संपूर्ण निधी स्वप्नीलच्या उपचारासाठी दिला होता. स्वप्नीलच्या दुर्देवी मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला वनविभागातर्फे आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. वनविभागातर्फे १० लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश पेडामकर कुटुंबाला सुपूर्द करण्यात आला आहे. या शासकीय मदतीसाठी रत्नागिरी-चिपळूणच्या विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मदतनिधी त्वरीत वितरित करण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. धनादेश देतेवेळी रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी विक्रम गुरव, देवरूखचे वनपाल सागर गोसावी, सर्व वनरक्षक, सुरेश बने, पप्पू नाखरेकर, संजय लाड, बंधू सुर्वे, सचिन मांगले, प्रमोद सुर्वे, निलेश भुवड, भाई चव्हाण, विशाल भानुशाली, अनूराग आखाडे यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. वनविभागाने वेळेत दिलेल्या या मदतीमुळे पेडामकर कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.