लांजा ( प्रतिनिधी) समाजामध्ये अजूनही ८० टक्के सज्जनशक्ती असून त्या सज्जन शक्तीला संघटित करून समाजासाठी तसेच राष्ट्र कार्यासाठी प्रेरित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मालवण येथील विभाग सहकार्यवाह डॉ. पंकज सुभाष दिघे यांनी लांजा येथे केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लांजा तालुक्याचा विजयादशमीचा उत्सव सोहळा त्रिमूर्ती मंगल कार्यालय ,लांजा येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वारकरी संप्रदाय आणि मराठा समाजाचे अध्यक्ष सुभाष राणे, तालुका संघचालक लक्ष्मण धनाजी कोकरे हे मंचावर उपस्थित होते.डॉ. पंकज दिघे पुढे म्हणाले की संघाची स्थापना १९२५ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. संघाच्या कार्याला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत .यानिमित्ताने विजयादशमीपासून पुढील एक वर्ष शताब्दी वर्ष म्हणून विविध कार्यक्रमाने साजरी करावयाची संघाने ठरवले आहे .पुढील वर्षभरात व्यापक गृह संपर्क अभियान, सामाजिक सद्भाव बैठक ,युवकांसाठी कार्यक्रम, हिंदू संमेलन ,प्रमुख नागरिक संवाद आणि शाखा सप्ताह आदी कार्यक्रम आयोजित केले जातील, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथेनुसार सुरुवातीला प्रस्तावना झाली.त्यानंतर शस्त्रपूजन आमदार किरण सामंत तसेच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते झाले.यानंतर शाखा लावण्यात आली. नंतर सामूहिक पद्य, अमृत वचन, वैयक्तिक पद्य यानंतर डॉ. पंकज दिघे यांचे बौद्धिक झाले.संघ प्रार्थना झाल्यावर अल्पोपहार देण्यात आला.
याप्रसंगी लांजातील विविध मान्यवर, न्याती बांधव असे १७४ नागरिक उपस्थित होते. तसेच २८ स्त्रिया आणि बाल स्वयंसेवक देखील उपस्थित होते.













