खेड नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी महिला आरक्षण जाहीर

वैभव खेडेकरांनी आनंद साजरा केला
खेड (प्रतिनिधी)– खेड नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्थानिक राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उत्साहाची लाट उमटली आहे. या निर्णयाचा आनंद व्यक्त करत स्थानिक माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पेढे वाटून फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी पुन्हा खेड नगरपालिकेवर आपलाच नगराध्यक्ष बसेल असा विश्वास व्यक्त करत खेड नगर परिषदेमध्ये पुन्हा आपलेच जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.
गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये खंड पडला होता. मात्र आता त्याला पुन्हा गती मिळाली असून आज मुंबई येथून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने खेड शहरात आनंदचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे खेळ शहराची धुरा पुन्हा एकदा महिलांच्या हाती जाणार असून महिला वर्गामध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. ही आरक्षण सोडत जाहीर होतात खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडत आनंद व्यक्त केला.
यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांना पेढे वाटून त्यांचे तोंड देखील गोड केले. खरंतर गेल्या अनेक वर्षापासून खेड नगरपालिकेची धुरा ही वैभव खळेकर यांच्या नेतृत्वाखाली असल्यामुळे भावी नगराध्यक्ष देखील आपलाच बसणार अशी आशा देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केली तसेच होणाऱ्या निवडणुकीत खेड नगरपालिकेत जास्तीत जास्त आपलेच नगरसेवक निवडून जातील असा विश्वास व्यक्त करत पुन्हा एकदा खेड नगरपालिकेची सत्ता आपल्याकडेच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सध्या वैभव खेडेकर हे कोणत्याही राजकीय पक्षात नसून नुकतेच गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेतून बडतर्फ करण्यात आले होते. यानंतर त्यांनी भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख देखील एकदा नव्हे तर दोनदा निश्चित करण्यात आली होती. यासाठी ते आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शेकडो गाड्या घेऊन मुंबईत देखील दाखल झाले होते. मात्र ऐनवेळी त्यांचा पक्षप्रवेश रद्द् झाल्याचे देखील पहावयास मिळाले होते. मात्र पक्षप्रवेश रद्द झाला असला तरी आपण मनाने भाजपवासी झाल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते व आपण भाजपचे काम देखील सुरू केल्याचे जाहीर केले होते. यामुळे वैभव खेडेकर व त्यांचे उमेदवार हे भाजपतून निवडणूक लढवणार की अन्य कोणत्या पर्याय अवलंबणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.