आंबा बागायतींतील फवारणीमुळे कोकणात कॅन्सरचा प्रसार
राजापूर (वार्ताहर): कोकणामध्ये विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हयात आंब्याच्या बागांमध्ये केल्या जाणाऱ्या फवारण्यांमुळे कोकणात कॅन्सरचा प्रसार होत आहे. तो रोखण्यासाठी कॅन्सर पेशंट एड असोसिएशन मुंबई आणि मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज देवगड यांच्या माध्यमातून कॅन्सरमुक्त कोकण ही चळवळ हाती घेण्यात आली त्याचा गरजुंनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे केले.
माजी आमदार प्रमोद जठार यांच्या विशेष प्रयत्नाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे कॅन्सर रूग्ण तसेच अन्य आजारांवर मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी श्री. जठार बोलत होते.
याप्रसंगी बौध्दजन संघ ग्रामिण अध्यक्ष महादेव गोठणकर, कॅन्सर पेशंट एड असोसिएशन मुंबईच्या अनिता पीटर, डॉ. कणेकर, डॉ. गिलडीयाल, डॉ. वीणा बोरकर, डॉ. योगीता लोनार, डॉ. मानसी आचललिया, फाटक नर्सिंग कॉलेजचे महेश खोत, डॉ. रामदास बोरकर, भाजपाचे अनिलकुमार करंगुटकर, प्रा. मारूती कांबळे, शितल पटेल, शितल रहाटे, सुधा चव्हाण, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा स्वाती करगुटकर आदी उपस्थीत होते.
कॅन्सर पेशंट एड असोसिएशन मुंबई आणि मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज देवगड व राजापूर तालुका बौध्दजन संघ मुंबई ग्रामिण शाखा राजापूर यांच्या वतीने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॅन्सर मुक्त कोकण मोहीमेअंतर्गत राजापूर येथुन या शिबीराची सुरूवात करण्यात आली.
या शिबीरात सुमारे ९० कॅन्सर तसेच अन्य विविध रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
–












