शिरगांव धनगरवाडी रस्त्याचा प्रश्न कायमचा सुटणार- सुरज शिंदे

चिपळूण (प्रतिनिधी) : इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य ना. अतुल सावे यांची नुकतीच सुरज शिंदे यांनी मंत्रालय मुंबई येथील त्यांच्या दालनात भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याबरोबर शिरगांव धनगरवाडी रस्त्याविषयी चर्चा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी निधी करिता पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा उदय सामंत यांच्या मागणीने एकूण ३ कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करिता ३५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. त्यानुसार पालकमंत्री ना. उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले असून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन ना. सामंत यांनी दिले.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगांव ता. चिपळूण येथील धनगरवाडी येथे जाण्याचा प्रमुख रस्ता कच्चा असल्या कारणाने पावसाळ्यात सदरचा रस्ता दरवर्षी वाहून जातो, त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होते. तसेच त्याची खूप मोठी झळ प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पोहचत आहे कारण धनगरवाडी पासून एकंदर ६ कि.मी. चे अंतर कापून चालत प्राथमिक शाळेपर्यंतर विद्यार्थ्यांना जावे लागते. तेथील अंगणवाडीमध्ये पावसाळ्यात अंगणवाडी सेविका रस्त्या अभावी शैक्षणिक सेवा देऊ शकत नाहीत. तशीच परिस्थिती तेथील रुग्ण /गरोदर माता यांचीही आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची कायमस्वरूपी सोय नसल्याकारणाने तेथील नागरिक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत त्यामुळे धनगरवाडी ओस पडत चालली आहे ही बाब खूप गंभीर बनली आहे. सध्या रस्त्याची परिस्थिती पाहता धनगरवाडी पर्यंत जाणारा रस्ता ग्रा. मा. ५६ एकूण ३.६ कि.मी. आहे. त्यातील ०.० ते ०.५ कि.मी. पर्यंत खडीकरण व ०.५ ते २.५ कि.मी. रस्त्याचे ६ मी. रुंदीचे मातीकाम पूर्ण झाले असून एकूण ३ कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे. ते झाल्यास या दुर्गम भागाचे सर्व प्रश्न सुटतील.