देवगड :देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नऊ अंगणवाड्या नादुरुस्त व धोकादायक अवस्थेत असल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष आणि भाजप देवगड मंडळाचे सरचिटणीस श्री. योगेश प्रकाश चांदोस्कर यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
नगरपंचायतीच्या हद्दीतील सर्व 19 अंगणवाड्या या बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी-सिंधुदुर्ग यांच्या प्रकल्पात समाविष्ट आहेत. त्यापैकी जामसंडे टिळकनगर, वडांबा, वेळवाडी, मळई, तरवाडी, भटवाडी तसेच देवगड बाजारपेठ, साटमवाडी आणि देवगड किल्ला येथील एकूण 9 अंगणवाड्यांची इमारत नादुरुस्त असल्याने तातडीने दुरुस्तीची गरज आहे.
सन 2025-26 च्या जिल्हा वार्षिक योजनेत या अंगणवाड्यांच्या इमारत दुरुस्तीसाठी आवश्यक निधी मंजूर करून मिळावा, अशी विनंती श्री. चांदोस्कर यांनी निवेदनातून केली आहे.













