प्राध्यापक प्रशिक्षण, विद्यार्थी इंटर्नशिप आणि ब्राझीलमध्ये जीआयटीची शाखा सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा
खेड (प्रतिनिधी) — ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे अभियांत्रिकी शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने 2007 साली स्थापन झालेले घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय (GIT), लवेल हे आज कोकण विभागातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षणसंस्था म्हणून ओळखले जाते. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि उद्योगस्नेही दृष्टिकोन यामुळे या महाविद्यालयाने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती साधली आहे. नुकतीच या महाविद्यालयाला ब्राझीलच्या “Ouro Fino Quimica” कंपनीने भेट दिली असून यावेळी विद्यार्थ्यांच्या इटर्नशिप साठी आणि प्राध्यापक प्रशिक्षण या सहज भविष्यात ब्राझीलमध्ये जीआयटी कॉलेजची शाखा सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा देखील झाली.
महाविद्यालयात सध्या केमिकल, मॅकॅनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल तसेच आधुनिक काळाच्या गरजेनुसार सुरू झालेली एआयएमएल (Artificial Intelligence and Machine Learning) ही शाखा कार्यरत आहे. याशिवाय 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून MMS (MBA) आणि MCA हे पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले असून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विस्तृत संधी उपलब्ध झाल्या आहेत. शैक्षणिक उत्कृष्टतेचा आणखी एक टप्पा गाठत घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाने 2025 मध्ये एकाचवेळी पाच विभागांना एनबीए (National Board of Accreditation) दर्जा मिळवून कोकणातील पहिले महाविद्यालय म्हणून इतिहास रचला आहे. या यशस्वी वाटचालीदरम्यान ब्राझीलमधील सुप्रसिद्ध औद्योगिक संस्था Ouro Fino Quimica या कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकतीच जीआयटीला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान प्राध्यापक प्रशिक्षण आणि विद्यार्थी इंटर्नशिप ब्राझीलमध्ये उपलब्ध करून देण्यासंदर्भात फलदायी चर्चा झाली. कंपनीचे अधिकारी श्री. लिओनार्डो रोड्रिगो दि सिल्व्हा, श्रीमती जॅकलीन कार्नेरो एल्स आणि श्री. निखिल दत्तो यांनी प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील व उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील यांच्याशी सविस्तर संवाद साधला. चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्रकल्प, संशोधन आणि उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी दोन्ही संस्थांदरम्यान सहकार्याच्या विविध शक्यतांवर विचारमंथन झाले.
यावेळी Ouro Fino Quimica कंपनीच्या प्रतिनिधींनी महाविद्यालयाच्या शाश्वत सेल (Sustainability Cell) तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी या उपक्रमांमागील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीकोन जाणून घेतला तसेच त्यांच्या कंपनीला उपयुक्त ठरू शकणारी माहिती संकलित केली. विशेष म्हणजे, चर्चेदरम्यान घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाची एक शाखा भविष्यात ब्राझीलमध्ये सुरू करण्याच्या संकल्पनेवरही सकारात्मक चर्चा झाली. या उपक्रमामुळे दोन्ही देशांतील शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात नव्या सहकार्याचे दालन खुले होणार आहे.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी Ouro Fino Quimica कंपनीच्या प्रतिनिधींचे स्वागत करून त्यांना महाविद्यालयाच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती दिली. त्यांनी या भेटीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक आणि औद्योगिक सहकार्याची नवी दिशा देणारी संधी ठरवली असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाच्या शेवटी जीआयटीच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. ही भेट म्हणजे घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि ब्राझीलच्या औद्योगिक क्षेत्रातील सहकार्याचा नवा अध्याय ठरला असून विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संधींची नवी दारे आता कोकणातील कॉलेजमधून विद्यार्थ्यांना खुली होणार आहेत.








