केंद्रप्रमुखांना वर्ग दोनची पदोन्नती द्या

 महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाची मागणी
 जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांची माहिती
चिपळूण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून शैक्षणिक गुणवत्ता विकास तथा सनियंत्रणाचे काम करणाऱ्या केंद्रप्रमुखांना वर्ग दोनची पदोन्नती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने राज्य शासनास करण्यात आल्याची माहिती संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी दिली आहे.
तीस वर्षांपूर्वी अर्थात १९९५ साली शैक्षणिक गुणवत्ता विकास, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व साक्षरता हे उद्दिष्ट २००० सालापर्यंत पूर्ण करण्याच्या हेतूने राज्य शासनाने केंद्रप्रमुख पदांची निर्मिती केली. प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांमधून पदोन्नती देऊन केंद्रप्रमुख हे पद अस्तित्वात आले. २००० साली हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर या पदाची उपयोगिता लक्षात घेऊन शासनाने हे पद कायम केले. शालेय शिक्षण विभागासोबतच ग्रामविकास विभागाची देखील मान्यता या पदाला मिळाली. सुरुवातीला जिल्हा परिषद शाळांचे सनियंत्रण केंद्रप्रमुखांकडे होते. मात्र त्यानंतर टप्प्याटप्प्याने केंद्रप्रमुखांना खाजगी प्राथमिक शाळा, खाजगी माध्यमिक शाळा व खाजगी कनिष्ठ महाविद्यालये, यासोबतच इंग्रजी शाळा, आश्रम शाळा या शाळांचे सनियंत्रण देखील सोपविण्यात आले. त्यामुळे केंद्रप्रमुखांच्या कर्तव्ये, अधिकार व जबाबदारी यामध्ये वाढ झाली. मात्र शासनाने पदोन्नतीबाबत उदासीनतेचे धोरण ठेवले. केंद्रप्रमुखांकडे उच्च शैक्षणिक पात्रता, पर्यवेक्षीय कामाचा अनुभव, संघटन कौशल्य, काम करून घेण्याची हातोटी इत्यादी गुण असताना देखील त्यांना वर्ग दोनची पदोन्नती मागील तीस वर्षांपासून देण्यात आली नाही. याउलट त्यांच्यापेक्षा इतर संवर्गातील अनेक कर्मचारी सेवा जेष्ठतेमध्ये कनिष्ठ असताना सुद्धा त्यांना वर्ग दोनची पदोन्नती मिळाली. त्यामुळे शासनाने केंद्रप्रमुखांना सुद्धा त्यांच्या कार्याशी निगडित अशा गटशिक्षणाधिकारी, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी, डायटचे अधिव्याख्याता, एकात्मिक बाल विकास योजनेचे प्रकल्प अधिकारी अर्थात सीडीपीओ तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी या वर्ग दोन च्या पदावर पदोन्नती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष अशोक महाले यांनी शासनाकडे एका निवेदनाद्वारे केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.