शहरातील रस्त्यांवरिल खड्डे व अन्य समस्यांच्या विरोधात शहर वासीय आक्रमक

न. प. वर धडक देत तात्काळ उपाययोजना करण्याची केली मागणी
सुधारणा न झाल्यास मोर्चा काढण्याचा दिला ईशारा

राजापूर प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्त्यासह अन्य भागातील रस्त्यांवर मोठया प्रमाणावर पडलेले खड्डे व यामुळे नागरिक व वाहन चालकांना होणारा मनस्ताप यांसह शहरातील विविध नागरी समस्यांच्या सोडवणूकीबाबत प्रशासनाला आलेले अपयश या विरोधात राजापूर शहरातील नागरिकांनी गुरूवारी एकत्र येत नगर परिषदेवर धडक देत प्रशासनाला जाब विचारला. यात सुधारणा झाली नाही तर भविष्यात मोर्चाद्वारे नगर परिषद कार्यालयावर धडक देवू असा इशाराही यावेळी प्रशासनाला देण्यात आला.
शहरातील मुख्य रस्त्यासह अन्य भागातील रस्त्यांवर मोठया प्रमाणावर पडलेले खड्डे व यामुळे नागरिक व वाहन चालकांना होणारा मनस्ताप, बंद असलेले अनेक पथदिप, शहरातील अस्वच्छता, मच्छीमार्केट असूनही रस्त्यावर होणारी मच्छी विक्री व यामुळे धोक्यात आलेले आरोग्य, मोकाट गुरे, बेशिस्त आठवडा बाजार, अनियमित होणारा पाणीपुरवठा या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. नगर परिषद प्रशासन नागरिकांकडून विविध कर आकारणी करत असतानाही आवश्यक त्या सेवा सुविधा मात्र पुरवत नाही. या विरोधात गुरूवारी शहरातील नागरिकांनी एकत्रित येत नगर परिषद प्रशासनाला जाब विचारला.
यावेळी नगर परिषद प्रशासनाकडून नागरिकांच्या प्रश्‍नांची उत्तरे देवून समाधान करण्याचा प्रयत्न करतानाच भविष्यात विकासकामे आणि समस्यांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचे आश्‍वासनही यावेळी प्रशासनाकडून देण्यात आले.
शहरातील या समस्यांसह रखडलेली विकासकामे आणि विविध समस्यांबाबत गुरूवारी राजापूरवासियांनी नगर परिषदेवर धडक दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, जयप्रकाश नार्वेकर, कल्याणी रहाटे, माजी नगरसेवक विनय गुरव, सुभाष बाकाळकर, अनिल कुडाळी, आजीम जैतापकर, अमृत तांबडे, हारूण साठी, शहबाज खलिफे, संगिता चव्हाण, कमलाकर कदम, संतोष हातणकर, रामचंद्र सरवणकर यांच्यासह मोठ्यासंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने आरोग्य निरिक्षक अमित पोवार, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सुप्रिया गोडेकर, बांधकाम अभियंता रणवीर कोकरेदेसाई, करनिरिक्षक प्रकाश शिंदे, स्वप्नील पड्यार आदींनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.
शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गंत रस्त्यावर सातत्याने खड्डे पडत असून त्यामध्ये आता धुळीच्या समस्येची भर पडली आहे. यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले असून यावर उपायोजना करण्याबाबत न. प. प्रशासनाकडून कोणतेही नियोजन दिसत नाही. मोकाट गुरे, मच्छीमार्केट असूनही रस्त्यावर होणारी मासे विक्री याविरोधात प्रशासकीय कारवाईचा केवळ दिखावा केला जात आहे. र प्रशासन नेमकं कोणाला पाठीशी घालतंय ? असा सवाल अ‍ॅड. खलिफे यांनी उपस्थित केला.
महामार्गाला जोडणाऱ्या कोंढेतड येथील रस्त्याच्या दुरूस्तीसह कोंढेतड भागामध्ये सुरळीत पाणीपुरवठा व्हावा अन्यथा, कोंढेतडवासियांच्यावतीने उपोषण छेडण्यात येईल असा इशारा माजी नगराध्यक्ष सौ. रहाटे यांनी दिला. बेशिस्त आठवडा बाजार, रस्त्यावर होणारी मासेविक्री, खड्यांमुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था, बेशिस्त आठवडा बाजार, बंदस्थितीतील पथदीप या समस्यांकडे श्री. नार्वेकर, श्री. गुरव, श्री. जैतापकर, श्री. कुडाळी, श्री. तांबडे, श्री. बाकाळकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. आता प्रशासनाकडून केवळ आश्‍वासने नको तर, थेट कारवाईची अपेक्षा आहे. अन्यथा, येत्या आठ दिवसांमध्ये न.प. वर मोर्चाद्वारे धडक देण्यात येईल असा इशारा यावेळी राजापूरवासियांकडून देण्यात आला.