रोटरी स्कूलमध्ये ‘जागतिक हात धुवा दिन’ उत्साहात साजरा

खेड – प्रतिनिधी
रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेड येथे बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘जागतिक हात धुवा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे आणि आरोग्याचे महत्त्व पटवून देणे हा होता.
या प्रसंगी शाळेतील शिक्षिका मिनाक्षी निवाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “हात स्वच्छ धुणे ही सवय आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. वेळोवेळी हात धुतले नाहीत, तर हातावरील जीवाणू व विषाणू तोंड, नाक, डोळे यांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करून आजार निर्माण करतात.” त्यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याच्या योग्य आठ पद्धती दाखवत, जेवणापूर्वी-जेवणानंतर व बाहेरून आल्यानंतर नेहमीच साबण किंवा हॅंडवॉशचा वापर करावा, असा सल्ला दिला.
यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष हात धुण्याचा सराव करून स्वच्छतेचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख सौ. तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण केल्याबद्दल शिक्षकवर्गाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.