चिपळूण (प्रतिनिधी) : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिनांक १२ जुलै रोजी चिपळूणमधील काणे बंधू हॉटेल (चिंचनाका) येथे नाबार्ड (रत्नागिरी) आणि विकास सहयोग प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक संस्था प्रतिनिधींसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील १८ सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, संयुक्त दायित्व समूहाच्या (जे.एल.जी) च्या महिला प्रतिनिधी आणि विविध उद्योग समूहातील ५० प्रतिनिधीनी आपापल्या संस्थांचे प्रतिनिधित्व केले.
यावेळी नाबार्डचे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा विकास प्रबंधक (डी.डी.एम.) मंगेश कुलकर्णी यांनी उपस्थित संस्था प्रतिनिधीना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले कि, नाबार्ड ही वरकरणी शासकीय आणि वित्तीय यंत्रणा जरी वाटत असली तरी ग्रामीण भागातील उपेक्षित समूहांचा सर्वांगीण विकास हे नाबार्डचे अंतिम धेय्य आहे. गेली अनेक वर्षे नाबार्ड संपूर्ण भारतात पाय रोवून काम करीत आहे. या कामामध्ये देशातील सामाजिक संस्थांचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यामुळे नाबार्डला गरजू आणि उपेक्षित समूहांपर्यत पोहोचणे सुलभ होत आहे. स्वयंसेवी संस्थांची नाळ ही तळागाळातील लोकसमूहापर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे आजचा दिवस हा नाबार्डबरोबर स्वयंसेवी संस्थांसाठी सुद्धा खासच आहे असे मानायला काहीही हरकत नसावी. यावेळी नाबार्डचे डी.डी.एम. मंगेश कुलकर्णी यांनी स्वयंसेवी संस्था आणि आम जनतेसाठी नाबार्डतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, उपक्रम यांची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विकास सहयोग प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन सुर्वे यांनी आपल्या मार्गदर्शन संवादात अनेक मुद्यावर बोट ठेवले. आज आपण हतबल झाल्यासारखे आहोत असे सार्वजनिक वातावरण आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर निसर्ग, पर्यावरण, शेती, जंगल, पाणी, जैवविविधता ई. सर्वच अडचणीत आहे. जागतिक तापमानवाढ हा देखील कळीचा मुद्दा आहे. कुटुंबव्यवस्था देखील मोडकळीस येत आहेत, त्यामुळे तळागाळात पाय रोवून काम करण्याची जबाबदारी स्वयंसेवी संस्थाना घ्यावी लागेल. सरकारमधील सारी माणसे चुकीची असतात ही आपली समज आहे. मात्र नाबार्ड, विदर्भ कोंकणग्रामीण बँक यांसारख्या यंत्रणा खूपच प्रभावित करीत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी या चांगल्या यंत्रणा आणि अधिकारी वर्गाच्या हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. बाहेरची परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्या परिस्थितीचे संधीमध्ये रुपांतर करण्याची गरज ओळखून आपण सर्वांनी काम करूया, असे आवाहन यावेळी मोहन सुर्वे यांनी केले. या कार्यक्रमाला विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचे चिपळूण शाखेचे शाखा व्यवस्थापक सोनल शहारे यांनी देखील मार्गदर्शन करताना विशेषतः बँकांमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध लोकाभिमुख उपक्रमांची माहिती उपस्थिताना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन विकास सहयोग प्रतिष्ठानचे विभागिय समन्वयक विजय कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प समन्वयक ललेश कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विकास सहयोग प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्या सौ.पूजा कासार, सौ.आशा गुरव यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.










