रत्नागिरी : रत्नागिरीतील कवी- गझलकार विजयानंद जोशी यांच्या ‘थोडं कळत थोडं नकळत’ या दुसर्या काव्य-गझल संग्रहाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ पत्रकार आणि प्रकाशक प्रमोद कोनकर यांच्याहस्ते झाले. जनसेवा ग्रंथालय आयोजित पुस्तक प्रकाशनाचा हा सोहळा राणी लक्ष्मीबाई सभागृह शेरेनाका येथे झाला.
कोकणातील समस्या, कोकणातील विषयांवर इथल्या लोकांनी सकसपणे लिहले पाहिजे. इथल्या समस्या कोकणातील लोकांनी मांडल्या पाहिजे, मात्र तसे न होता कोकणावर मुंबई-पुण्यातील लोकं लिहतात, बोलतात. यामुळे इथल्या लेखकांनी अधिक सकस, दर्जेदार लेखन करायला हवं, असे मत यावेळी बोलताना प्रमोद कोनकर यांनी मांडले. यावेळी विनय परांजपे यांनी काव्य-गझल संग्रहाचा सुरेख रसास्वाद केला. विविध कविता-गझलांचा परामर्श घेत त्यांनी या कवितासंग्रह वाचण्यासाठी उत्कंठा वाढविली. जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आपण कविता करता-करता गझल प्रवासाकडे कसे वळलो, याचा प्रवास कवी विजयानंद जोशी यांनी मनोगतात मांडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल पालये यांनी केले.
कार्यक्रमाला बालरोगतज्ज्ञ प्रभुदेसाई, सु.द.भडभडे, कवी नितीन देशमुख, संजय कुळ्ये, अरुण मौर्य यांसह काव्यरसिक, वाचक-सभासद उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनाच्या यशस्वीतेसाठी जनसेवाच्या ग्रंथपाल अनुजा पटवर्धन, कर्मचारी सुजाता कोळंबेकर, सौ.भोसले यांनी मेहनत घेतली.













