घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल येथे “Integrating AIML and Computational Techniques” या विषयावर ATAL फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम

खेड (प्रतिनिधी) – घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल येथे एआयसीटीई ट्रेनिंग अँड लर्निंग (ATAL) अकॅडमी या प्रतिष्ठित उपक्रमांतर्गत फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (FDP) आयोजित करण्यात आला आहे. “Integrating AIML and Computational Techniques: Transforming Innovation in Engineering and Sciences” या विषयावर आधारित हा सहा दिवसांचा ऑनलाईन कार्यक्रम ३ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार आहे. हा कार्यक्रम कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे.
या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश शिक्षक, संशोधक तसेच उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML) आणि कंप्युटेशनल टेक्निक्स या वेगाने विकसित होणाऱ्या बहुविद्याशाखीय क्षेत्रातील ज्ञान व कौशल्य वृद्धीचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. आधुनिक अभियांत्रिकी आणि विज्ञान क्षेत्रात AIML आणि कंप्युटेशनल तंत्रज्ञानाची एकत्रित भूमिका किती महत्त्वाची ठरत आहे, याविषयी सखोल माहिती या कार्यक्रमाद्वारे सहभागींपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅममध्ये देश-विदेशातील नामवंत शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञांचे थेट ऑनलाईन सत्र, संवादात्मक चर्चा तसेच प्रात्यक्षिक प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी शिक्षक व संशोधकांना AIML मधील नव्या प्रवाहांबरोबरच या तंत्रज्ञानाचा उद्योग क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपयोग कसा करता येईल याची मौल्यवान माहिती मिळणार आहे.
AICTE मान्यताप्राप्त संस्था, संशोधक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच इतर इच्छुकांनी या विशेष संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विकास खालकर आणि प्रा. राजकुमार पवार यांनी केले आहे. संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य असून इच्छुकांनी ATAL अकॅडमीच्या अधिकृत पोर्टलवर — https://atalacademy.aicte.gov.in/login — या लिंकवर जाऊन आपली नोंदणी करावी, असे महाविद्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित हा कार्यक्रम आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण विचारांना चालना देणारा ठरणार असून, अभियांत्रिकी शिक्षणातील अध्यापन आणि संशोधनाच्या गुणवत्तेत भर घालणार आहे.