रत्नागिरी जिल्हा पोलिसांतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘एकता दौड’ उत्साहात पार!

दापोली :– भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ‘राष्ट्रीय एकता दिवस’ (Rashtriya Ekta Diwas) निमित्ताने “एकता दौड” (Run for Unity) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता दापोली येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
देशाच्या एकता, अखंडता आणि सुरक्षेच्या भावनेला बळकटी देण्यासाठी तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशासाठी केलेल्या अद्वितीय कार्याचे स्मरण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या ‘एकता दौड’ उपक्रमाचा शुभारंभ दापोली पोलीस ठाण्यातून करण्यात आला. या वेळी दापोली पोलीस ठाण्याचे अधिकारी महेश तोरस्कर यांच्या हस्ते दौडीचा प्रारंभ झाला. या दौडीत पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक मान्यवर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
ही दौड दापोली पोलीस ठाणे येथून सुरू होऊन केळस्कर नाका, बुरोडी नाका, कोकण कृषी विद्यापीठ मार्गे समाली हॉटेलपर्यंत जाऊन पुन्हा दापोली पोलीस ठाण्यात परत आली. कार्यक्रमादरम्यान सहभागींसाठी वैद्यकीय सहाय्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दापोली पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत देशातील ऐक्य, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात सहभाग नोंदविला.
‘एकता दौड’च्या माध्यमातून दापोलीत देशभक्ती, संघभावना आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश अधिक दृढपणे पोहोचविण्यात आला.