खासदार नारायण राणे यांचे जिल्हा प्रशासनाला सूचना
लांजा | संतोष कोत्रे : घनकचरा प्रकल्पासंदर्भात कोत्रेवाडी ग्रामस्थांची तातडीने भेट घेऊन म्हणणे रेकॉर्ड करा आणि मला तातडीने माहिती सादर करा असे आदेश, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार सघाचे खासदार नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
. कोत्रेवाडी घनकचरा (डम्पिंग ग्राउंड) प्रकल्पासंदर्भात गेल्या ८० दिवसापासून उपोषणाला बसलेल्या कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या प्रश्नासंदर्भात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव यांनी रत्नागिरी येथे पार पडलेल्या खासदार नारायण राणे यांच्या जनता दरबारात लक्षवेधी प्रश्न मांडला होता. त्यानंतर खासदार नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत तातडीने ग्रामस्थांची भेट घेऊन माहिती सादर करा असे आदेश दिले आहेत.
लांजा नगरपंचायतीच्या वतीने कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. लोकांना देशोधडीला लावणारा हा प्रकल्प रद्द करावा किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा या मागणीसाठी कोत्रेवाडी ग्रामस्थ १४ ऑगस्ट पासून लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहेत. गेले ८० दिवस झाले तरीदेखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात आहे .
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे पार पडलेल्या खासदार नारायण राणे यांच्या जनता दरबारात भाजपाचे येथील माजी नगरसेवक आणि जिल्हा उपाध्यक्ष असलेले संजय यादव यांनी विशेष लक्षवेधी प्रश्न मांडला होता. ग्रामस्थ या प्रकल्पा विरोधात १४ ऑगस्ट पासून उपोषणाला बसलेले आहेत. कोकणातील प्रमुख सण असलेला गौरी गणपती, दसरा त्याचप्रमाणे दिवाळी हे सण देखील ग्रामस्थांच्या उपोषणामध्येच गेले आहेत. आज या उपोषणाला ८० दिवस होऊन देखील प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याची बाब जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव यांनी खासदार नारायण राणे यांच्या जनता दरबारात प्रकर्षाने मांडली होती. ग्रामस्थांची बाजू तसेच एकूणच वस्तुस्थिती त्यांनी कथन केली होती.
ही बाब लक्षात घेऊन खासदार नारायण राणे यांनी देखील जिल्हा प्रशासनाला तात्काळ माहिती घेऊन म्हणणे तात्काळ रेकॉर्ड करून मला त्यासंबंधी माहिती द्यावी असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. इतक्या दीर्घकाळ लोक उपोषणाला बसणे हे योग्य नाही, अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी प्रशासनाच्या कारभाराबात नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे प्रशासनाने तातडीने संबंधित जनतेची बैठक घ्यावी असे देखील आदेश खासदार राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले .
चौकट- दरम्यान प्रशासन हे माणुसकी धर्म विसरून कोत्रेवाडी ग्रामस्थांशी वागत असून हे योग्य नाही. म्हणूनच आपण या संदर्भात खासदार नारायण राणे यांच्याशी बोललो असून त्यांनी दिलेल्या आदेशामुळे लवकरच लोकांना ठोस असे उत्तर मिळेल असे जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव म्हणाले.













