वेरळ-जांबुर्डे ग्रामपंचायतीतर्फे अंगणवाडीतील मुले, किशोरवयीन मुली व मातांना ड्रायफ्रुट वाटप

खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील वेरळ येथील ग्रुप ग्रामपंचायत वेरळ-जांबुर्डे यांच्या वतीने आरोग्य आणि पोषण जागृतीचा संदेश देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. दिनांक ३० ऑक्टोबर रोजी प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक चारमध्ये लाभार्थ्यांना ड्रायफ्रुट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे, उत्साहाचे आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमांतर्गत अंगणवाडीतील लहान मुले, किशोरवयीन मुली, स्तनदा माता आणि गरोदर मातांना पौष्टिक आहाराचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून ड्रायफ्रुटचे वाटप करण्यात आले. महिलांमध्ये आणि बालकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढविणे, तसेच पोषणाचे महत्त्व समजावून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य श्री. निलेशशेठ बामणे, श्री. अक्षयशेठ तांबे, सौ. ज्योतीताई पिंपळकर, सौ. शेजलताई शिंदे तसेच गावचे पोलीस पाटील श्री. संजयजी शिंदे यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका तसेच ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.
प्रभाग क्रमांक तीन आणि चारमधील दोन्ही केंद्रांवर कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. स्थानिक ग्रामस्थांनी या आरोग्यवर्धक उपक्रमाचे कौतुक करत, अशा प्रकारच्या पोषणविषयक योजना नियमितपणे राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.