चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील व अनिरुद्ध निकम यांनी बारामती कृषि विज्ञान केंद्र येथील अॅग्री कल्चर ए आय सेंटर व नेचर डिलाईट डेअरी, इंदापूर येथे दि. २७ व २८ ऑक्टोबर रोजी भेट दिली. या अभ्यास दौऱ्यामध्ये आ. शेखर निकम, डॉ.सुनितकुमार पाटील यांनी ए आय सेंटर मधील नाविन्यपूर्ण व संशोधनात्मक प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञान, कृषि विज्ञान केंद्रांतर्गत विविध पिकांवर सुरु असणार्या संशोधनचा सखोल अभ्यास केला.
तसेच नेचर डिलाईट डेअरी च्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आ. निकम व पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहीले. नेचर डिलाईट डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई यांनी दोन्ही मान्यवरांचा सन्मान केला. यावेळी आ. शेखर निकम यांचे हस्ते वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय व नेचर डिलाईट डेअरी यांच्या सामंजस्य करारा अंतर्गत ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. यामध्ये भविष्यकाळात महाविद्यालयामध्ये विविध कृषिपुरक प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच नेचर डिलाईट डेअरी सदैव यासाठी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन अध्यक्ष अर्जुन देसाई यांचे तर्फे देण्यात आले. आमदार शेखर निकम, डॉ.सुनितकुमार पाटील व अनिरुद्ध निकम यांनी डेअरीमधील विविध विभागांना भेट दिली व डेअरी च्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील व अनिरुद्ध निकम यांचे हस्ते नेचर डिलाईट डेअरी मधील कुशल अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे कृषि विभाग प्रमुख डॉ.हरिश्चंद्र भागडे, प्रा.प्रसाद साळुंके व विपुल घाग उपस्थित होते.












