विजेचा धक्का लागून उचागवामध्ये शाळकरी मुलाचा मृत्यु

प्रतिनिधी/रोहन कांबळे :कोल्हापूर: जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील उचगाव गावात बुधवारी सायंकाळी विजेच्या धक्क्याने झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. पतंग काढण्याच्या प्रयत्नात हा अनर्थ घडला असून गावात शोककळा पसरली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,

सार्थक नीलेश वळकुंजे (वय १६) आणि त्याचा धाकटा भाऊ कार्तिक वळकुंजे (वय १४) हे उचगाव येथे आपल्या परिवारासह राहतात. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास उचगाव गावात घडली. घटनेनंतर गांधीनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

बुधवारी संध्याकाळी दोघेही भाऊ बाहेर खेळत असताना उचगाव येथील घराजवळ एका उडत्या पतंगाची दोरी वीज वाहक तारांमध्ये अडकलेली दिसली. अडकलेला पतंग काढण्यासाठी त्यांनी घराच्या छतावर चढून प्रयत्न सुरू केला. यासाठी त्यांनी अंदाजे दहा मिलिमीटरची लोखंडी सळई वापरली. मात्र, पतंग सोडवताना त्या सळईचा स्पर्श वरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत तारेला झाला आणि विजेचा जोरदार धक्का बसला.या धक्क्याने सार्थक जागेवरच कोसळला, तर कार्तिकलाही शॉक बसून तो खाली पडला. आजुबाजूच्या लोकांनी तत्काळ धाव घेत दोघांनाही सीपीआर रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी सार्थकला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दोघा भावांपैकी एक भावाच्या या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.