कमी कालावधीमुळे राजकिय पक्षांची होणार धावाधाव
युती-आघाडी होणार की सर्व पक्ष स्वतंत्र लढणार? सर्वांचे लागले लक्ष
निलेश जाधव / देवरूख
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायतची निवडणुक होणार असल्याने देवरूखमध्ये राजकिय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. नगराध्यक्षापदासाठी महिला आरक्षण पडल्याने देवरूख नगरपंचयतीवर महिलाराज येणार हे निश्चित आहे. परंतु नगराध्यक्षा पदासाठी कोणाला संधी मिळणार? याबाबतच सर्वांची उत्सुकता आत्तापासूनच ताणली गेली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात सर्वच राजकिय पक्ष उतरणार असल्यामुळे ही निवडणुक रंगतदार होणार यात शंका नाही.
तालुक्यातील देवरूख हे अत्यंत महत्वाचे शहर असून या शहरात तालुक्याची सर्व शासकीय कार्यालये आहेत. त्याशिवाय देवरूखमध्ये मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे शासकीय कामानिमित्त किंवा खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक देवरूखात येत असतात. पुर्वी देवरूख शहराचा कारभार ग्रामपंचायतीमार्फत हाकला जात होता. मात्र देवरूख शहराचा विस्तार वाढत गेला. त्याचबरोबर लोकसंख्याही वाढत गेली. त्यामुळे १३ वर्षांपुर्वी देवरूख ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाल्यानंतर २०१३ ला पहिली निवडणुक झाली. निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेच्या युतीची सत्ता आली. पहिल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात भाजप शिवसेना युतीची सत्ता होती यात सव्वा सव्वा वर्षाच्या कार्यकाळात देवरूखच्या पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा मान शिवसेनेच्या नीलम हेगशेट्ये यांना मिळाला होता. त्यानंतर सव्वावर्षे भाजपच्या स्वाती राजवाडे नगराध्यक्षा झाल्या.
अडीच वर्षांनंतर सेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा पडला. यानंतर भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतले. व पुढील अडीच वर्षांकरिता भाजपच्या निलेश भुरवणे यांच्या गळ्यामध्ये नगराध्यक्षपदाची माळ पडली होती. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये भाजपने थेट नगराध्यक्षपदी मुसंडी मारत पाच वर्षे निर्विवाद सत्ता संपादन केली होती. नगरसेवकांच्या संख्या बळाचा विचार करता त्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि भाजप व मनसे यांची समान संख्या होती. मात्र तरीही भाजपने किमया करत थेट नगराध्यक्षपदी विजय प्राप्त केला होता. यावेळी भाजपचे ७ नगरसेवक निवडून आले होते. मनसे १, अपक्ष १, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादीचे ४ असे पक्षीय बलाबल होते. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपच्या सौ. मृणाल शेट्ये यांनी बाजी मारली. व पाच वर्षे अतिशय उत्तमरित्या कारभार केला.
देवरूखात भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, मनसे असे पक्ष
कार्यरत असुन थेट नगराध्यक्ष पदाकरिता प्रत्येकाने आपला उमेदवार देण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. अजुन तरी आघाडी, युती कि विकास पॅनेल असे चित्र स्पष्ट नसल्याने निवडणुक दुरंगी, तिरंगी, चौरंगी होणार हे सध्या तरी सांगता येणार नाही. मात्र भाजपने पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. नगराध्यक्षपदी आपला उमेदवार विजयी होण्यासाठी भाजप आग्रही असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यादृष्टीने भाजपने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. या निवडणुकीकरीता युती की आघाडी होणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. ते लवकरच स्पष्ट होईल मात्र या निवडणुकीत सर्वच पक्ष ताकदीनिशी उतरणार असल्याचे बोलले जात आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकद आजमवणार आहेत. त्यामुळे ही निवडणुक हायहोल्टेज असणार आहे. दरम्यान, या निवडणुकीकरीता महिनाभरापेक्षाही कमी कालावधी मिळणार असल्याने सर्वच राजकिय पक्षांची चांगलीच धावपळ होणार आहे.











