ऐन थंडीत राजापुर शहरातील राजकिय वातावरण तापणार राजकिय पक्षांसह उमेदवारांचा लागणार कस

नरेंद्र मोहिते राजापूर,
कधी जाहिर होणार.. कधी जाहिर होणार अशी प्रतिक्षा असलेल्या राजापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक अखेर मंगळवारी जाहिर झाली आहे. डिसेंबर २०२१ ते आज तागायत तब्बल पावणेचार वर्षांनी जाहिर झालेल्या या निवडणूकीने आता शहारातील राजकिय वातावरण चांगलेच तापणार आहे. लोननियुक्त नगराध्यक्ष पदासह दहा प्रभागांतील वीस नगरसेवक पदांसाठी होणाऱ्या या निवडणूकीसाठी सर्वच राजकिय पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र या निवडणूकीसाठी असलेला कालावधी काहीसा कमी प्रमाणात असल्याने निवडणूक कार्यक्रम व आचारसंहिता जारी होताच प्रशासनासह राजकिय पक्ष व उमेदवारांची चांगलीच गडबड सुरू झाली आहे. राजापूर शहराचे राजकारण कायमच चर्चेत राहिलेले आहे. जिल्हयात धक्कादायक निकालाची परंपरा असलेल्या राजापूर नगर परिषदेच्या तब्बल नऊ वर्षांनी होणाऱ्या या निवडणूकीत राजापूरवसीय कोणाला कौल देणार हे आता ३ डिसेंबरला सष्ट होणार असून पुढील २५ दिवसांत ऐन थंडीत राजापूरचे राजकिय वातावरण चांगलेच तापणार आहे.
राजापूर नगर परिषदेची यापुर्वीची पंचवार्षीक निवडणूक डिसेंबर २०१६ मध्ये झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे हनिफ मुसा काझी हे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. तर सत्ताही काँग्रेसने राखली होती. मात्र त्यानंतर जातप्रमाणपत्र अवैधतता प्रकरणामुळे काझी यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी झालेला पोटनिवडणूकीत काँग्रेस पक्षाचे एड. जमिर खलिफे हे विजयी झाले होते. त्यानंतर सन २०२१ मध्ये मुदत संपल्याने नगर परिषदेवर प्रशासकिय राजवट होती.
राजापूर नगर परिषदेच्या निवडणूकीचे निकाल अनेकवेळा धक्कादायक लागेलेले आहे. गतवेळी नगर परिषदेवर काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. त्यावेळी नगराध्यक्षांसह दहा सदस्य होते. तर विरोधी बाकावर असलेल्या एकसंघ शिवसेनेकडे आठ सदस्य होते. आता गेल्या तीन वर्षातील अनेक राजकिय घडामोडी, लोकसभा व विधानसभा निवडणूका यानंतर होणाऱ्या या नगर परिषदेच्या निवडणूकीबाबत कमालीची उत्सुकता साऱ्यांना लागून राहिली आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या विविध राजकिय घडामोडीत अनेकांनी आपले पक्षही बदलले आहेत. तर शहरातील अनेक विकासाचे मुद्देही या निवडणूकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी रहाणार आहेत. तर वाढलेले मतदारही या निवडणूकीत निर्णायक कौल देणारे ठरणार आहेत. त्यामुळे राजापूर शहर वासीय काय आणि कोणाला कौल देतात हे पहाणेही महत्वाचे ठरणार आहे.
आता निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. आता लोकनियुक्त नगराध्यक्षांसह वीस नगरसेवक निवडून देण्याची संधी शहरवासीयांना आहे. नवीन प्रभाग रचनेप्रमाणे नगरसेवकांची संख्या तीनने वाढली असून दहा प्रभागांतुन वीस नगरसेवक निवडले जाणार आहेत. राजापूरचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला राखीव असल्याने या पदावर महिलेला संधी मिळणार आहे. तर ५० टक्के महिला आरक्षणाप्रमाणे २० पैकी १० सदस्य संख्या ही महिलांची असणार आहे. त्यामुळे महिलांनाही राजकारणात काम करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. तर दोन स्विकृत नगरसेवकही सभागृहात येणार असून सभागृहातील लोकप्रतिनिधींची संख्या ही २३ इतकी होणार आहे.
केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतही महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याबाबत अद्याप निश्चित भूमिक जाहिर झालेली नाही. मात्र शिवसेना महायुतीसाठी आग्रही असून याबाबत लवकच पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय जाहिर करण्याची शक्यता आहे. तर सन १०१९ मध्ये अस्तीत्वात आलेली महाविकास आघाडी आजपर्यंत सर्वच निवडणूका एकत्रित लढल्याने याही निवडणूका एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे होणारी लढत ही महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी होण्याची शक्यता आहे. मात्र राजापुरात कायमच अपक्षही आपले नशीब आजमावत असतात त्यामुळे त्यांचा काय व किती प्रभाव राहिल हे देखील महत्वाचे ठरणार आहे.
राजापूर नगर परिषदेच्या या निवडणूकीत एकूण ८ हजार १४३ इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ४ हजार २१९ महिला मतदार तर ३ हजार ९२४ इतके पुरूष मतदार यांचा समावेश आहे. त्यामुळे संपुर्ण शहरासह प्रभागांतील महिला मतदारांची संख्या हीच शहराचा नगराध्यक्ष व आपल्या प्रभागांतील नगरसेवक ठरविणार आहेत . एकूण ८ हजार १४३ इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ४ हजार २१९ महिला मतदार तर ३ हजार ९२४ इतके पुरूष मतदार यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १ हजार ६० इतके मतदार हे प्रभाग क्रमांक सहा मध्ये असून सर्वात कमी मतदार हे प्रभाग क्रमांक तीन मध्ये ५९६ इतके आहेत.
या नगर परिषद निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास 10 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार असून 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. असून अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर पर्यंत असून, निवडणूक चिन्हांचे वाटप 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी तर निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे.
महिला मतदारांची वाढीव संख्या, नवीन मतदारांची नोंद, शहरातील विकासाचे मुद्दे, पक्षांमध्ये होणाऱ्या लढती, उमेदवार व त्यांची लोकप्रियता अशा अनेक मुद्यां भोवती राजापूर नगर परिषदेची निवडणूक फिरणार आहे एवढं मात्र नक्की. मात्र आता पुढील २६ दिवस याबाबत चांगलीच चर्चा शहरातील नाक्या नाक्यावर रंगणार असून राजापूरचे वातावरण गुलाबी थंडीत चांगलेच तापणार आहे.