सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांत महायुती व्हावी, याच मताचा मी आहे – खासदार नारायण राणे

कणकवलीत पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका; “मी असेपर्यंत राणे कुटुंबात वाद होणार नाही”

कणकवलीत जर शिंदे शिवसेना आणि उबाठा सेना एकत्र येत असतील तर शिंदे शिवसेने सोबतचे संबंध तोडू

कणकवली :
सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांत महायुती व्हावी, या मताचा मी आहे. यासंदर्भात उद्या बैठक होऊन जागांचा फॉर्म्युला ठरेल. या दोन्ही जिल्ह्यांत भाजपाचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसावा. युती झाल्यानंतर ८० टक्क्यांहून अधिक जागा महायुतीकडे जातील, याचा मला विश्वास आहे,” असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.
येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार

परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी व संचालक महेश सारंग उपस्थित होते.
राणे म्हणाले, “सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांत युती व्हावी, अशी माझी इच्छा आहे. यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला उद्या ठरविला जाईल. फॉर्म्युला माझ्याकडे आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. पण मी स्पष्ट सांगतो — युती व्हायलाच हवी. युतीबाबतचा अंतिम निर्णय पालकमंत्री घेत नाहीत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवले आहेत, मग आता अडचण कोणती?” असा सवाल त्यांनी केला.

“मी आहे तोपर्यंत राणे कुटुंबात वाद होणार नाही”

“गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राणे कुटुंबाविषयी विविध बातम्या येत आहेत. पण मी आहे तोपर्यंत आमच्यात अंतर्गत वाद होणार नाहीत आणि मी होऊ देणार नाही. गेली ३५ वर्षे जिल्ह्यात राजकारण करतोय. सर्वांनी साथ दिली आणि यापुढेही साथ मिळेल. सर्वांची इच्छा युती व्हावी अशीच आहे,” असेही राणे म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नीतेश राणे या विषयाचा विचार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“राज-उद्धव ठाकरे अस्तित्व टिकवण्यासाठी बोलत आहेत”

“उद्धव ठाकरे आता शेतकऱ्यांसाठी मागण्या करत आहेत; मात्र ते मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी नेमके काय केले? त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोणती पावले उचलली? राज आणि उद्धव ठाकरे हे फक्त आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी बोलत आहेत. सत्तेवर येण्याची क्षमता त्यांच्यात नाही,” अशी टीका राणे यांनी केली.
ते पुढे म्हणाले, “राज्यातील तीन पक्षांचे सरकार सलोख्याने काम करत आहे. त्यात काही जण विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढी वर्षे मुंबई महानगरपालिकेत सत्ता असूनही काही केले नाही. केले असते, तर आज प्रचाराची वेळ आली नसती.”

चिपी विमानसेवा आणि रेल्वे प्रकल्पावर राणेंचा आग्रह

“चिपी विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पेट्रोल खर्चालाही मान्यता मिळाली आहे. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेसाठीचा सर्व्हे पूर्ण झाला असून, कोकण रेल्वेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने पुढाकार घेतल्यास हा प्रकल्प गती घेईल,” असेही राणे यांनी स्पष्ट केले.
पान १ वर घ्या हा

“..तर शिवसेनेसोबतचे संबंध तोडू” — राणे यांचा इशारा
“कणकवलीत जर शिंदे शिवसेना आणि उबाठा एकत्र येत असतील, तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतचे संबंध आम्ही तोडू,” असा थेट इशारा राणे यांनी दिला.

ते म्हणाले, “राजन तेली हे शिंदे शिवसेनेत तात्पुरते आहेत. माझी आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यावर त्यांचे भवितव्य ठरेल. विशाल परब स्वतःला मोठा विचारवंत समजतात; त्यांनी भाजपावर किती टीका केली आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. माझी भेट झाल्यावर त्यांना समजेल. त्यावेळी ब्रेकिंग न्यूज मिळेल आणि वाचवायला कुणीही येऊ दे,” असे त्यांनी आवर्जून नमूद केले.