दापोली प्रतिनिधी:-
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी. हायस्कूल, दापोली येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय समिती चेअरमन मा. श्री. रविंद्र कालेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
हे वर्ष ‘वंदे मातरम’ गीताच्या दीडशे वर्षपूर्तीचे असल्याने स्नेहसंमेलनाची सुरुवात संपूर्ण वंदे मातरम गायनाने झाली. प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री. शैलेश आठल्ये यांनी वंदे मातरम गीताचे महत्त्व सांगून देशरागामध्ये ते सादर केले, त्यांना विद्यार्थ्यांनी सुंदर साथ दिली.
यानंतर प्रतिवर्षाप्रमाणे नांदी गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘शाकुंतल’ या नाटकातील ‘पंचतुंड नररुंड मालधर’ या नांदीने स्नेहसंमेलनाचा प्रारंभ झाला. तबला साथ श्री. मकरंद सोमण तर संवादिनी साथ श्री. शंतनू काणे यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात कोळी नृत्य, मंगळागौर, पोवाडा, शेतकरी नृत्य, आदिवासी नृत्य, भजन, जाखडी नृत्य, रेकॉर्ड डान्स अशा विविध कलाविष्कारांद्वारे आपली प्रतिभा सादर केली.
या कार्यक्रमासाठी माजी प्रसाद फाटक, मुख्याध्यापक शरद कांबळे, उपमुख्याध्यापक अर्जुन घुले, पर्यवेक्षक ए.एस. पेठकर, शिक्षक प्रतिनिधी श्री. मोहिते पी.इ., सौ. दाबके आर.व्ही., शिक्षकेतर प्रतिनिधी शिर्के एस.एस., ज्येष्ठ शिक्षिका मानसी अभ्यंकर, ज्येष्ठ शिक्षक एच.एस. कुलकर्णी, कलाशिक्षक श्रीराम महाजन, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी सार्थक पाटील, आर्या कराड, शर्वरी नांदिस्कर, मिहीर कोपरकर, हर्षदा निवळकर, अरुण बारे यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











