कृषी विभागाकडून तातडीने दखल किटक नाकतोडे असल्याचे निष्पन्न
आचरा | अर्जुन बापर्डेकर : एकीकडे उशिराने आगमन झालेल्या पावसाने शेतीची कामे रेंगाळलेली आहेत..मात्र पाण्याचे दुर्भिक्ष असताना वेळेवर शेतीची कामे होण्यासाठी बोअरवेलच्या पाण्यावर रुजवलेल्या
भातशेतीवर पोपटी रंगाच्या किटकांच्या आक्रमणाने शेतकऱ्यांची शेती संकटात सापडण्याची भिती निर्माण झाली आहे.याबाबत आचरा कृषी सहाय्यक शिंदे यांनी तातडीने दखल घेत पहाणी करुन नाकतोड्या किटक असल्याचे सांगितले.तसेच अशा प्रकारचे किटक शेतात आढळल्यास. क्लोरोपायरीफास ची फवारणी करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
शनिवारी भातलावणीच्या वेळी आबा सावंत यांच्या
आचरा तिठा लगतच्या शेतात या किटकांचा प्रादुर्भाव त्यांच्या दृष्टीस पडला.हिरव्या रंगाचे हे किटक थव्या थव्याने भातरोपांच्या कोवळ्या पातींचा फडशा पाडत असल्याचे दिसून आले.. एवढ्या मोठ्या प्रमाणात आकस्मिक आलेल्या किटकांच्या प्रादुर्भावामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.निसर्गाच्या अनियमितपणा बरोबरच वाढत्या खर्चामुळे शेतीकरणे परवडत नसल्याचे सांगत अनेक शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे.त्यामुळे पडीक क्षेत्रात वाढ होत आहे.मात्र यावर मात करत शेतीची कास धरणारया शेतकऱ्यांच्या शेतीवर येणाऱ्या संकटांनी शेतकरी हवालदिल झाले आहेत.सध्या सावंत यांच्याच शेतात हे किटक आढळून आले आहेत.
आचरा येथे शेतात आढळलेला किटक नाकतोड्या–शिंदे
आचरा कृषी सहाय्यक सुशिलकुमार शिंदे यांना याबाबत समजताच त्यांनी याशेताची पहाणी करुन सदर किटक हा नाकतोड्या असल्याचे सांगितले. सध्या वातावरणातील आद्रतेमुळे आणि शेतातील खाचरात साचलेल्या पाण्यामुळे नाकतोड्या च्या वाढीस पोषक वातावरण तयार झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावर घाबरुन न जाता क्लोरोपायरीफास पाचशे लिटर पाण्यात साडेसातशे मिली मिसळून फवारणी करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
फोटो –शेतीत आलेले किटक
औषध फवारणी नंतर मरून पडलेले किटक दाखवताना सावंत