राजापूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीची घोषणा

नगराध्यक्षपदासह १६ नगर सेवक पदांचे उमेदवार जाहीर
१६ पैकी २ जागा भाजपाला 
लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सौ. श्रृती ताम्हनकर यांना उमेदवारी

राजापूर (वार्ताहर): राजापूर नगर परिषदेच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस उरला असताना रविवारी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतर्फे ही निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर यावेळी राजापूऱ् नगराध्यक्षपदासह २० पैकी १६ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा लांजा येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी शिवसेना भाजप महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेतर्फे सौ. श्रृती श्रीकांत ताम्हनकर यांची नावाची घोषणा करण्यात आली. त्यांचे आमदार किरण सामंत यांनी स्वागत केले.

राजापूर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरू झाली होती. मात्र राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. शनिवारी शिवसेना उबाटा पक्षाकडून दोन उमेदवारांनी आपली अधिकृत उमेदवारी दाखल केली. मात्र अन्य राजकीय पक्षांनी शनिवार अखेरपर्यंत आपली यादी जाहीर केली नव्हती.

दरम्यान रविवारी सकाळी लांजा येथे महायुती तर्फे पत्रकार परिषद घेत लांजा नगर पंचायत आणि राजापूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत यांनी ही यादी जाहीर केली.

त्यामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये सक्रीय असलेल्या सौ. श्रृती श्रीकांत ताम्हनकर यांना शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी देण्यात आली. तर जाहीर करण्यात आलेल्या १६ नगरसेवक पदांपैकी २ जागा भाजपाला सोडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रभाग २ ‘ब’ मधुन सौ. सुयोगा सुनिल जठार व प्रभाग क्र. ७ ‘अ’ मधुन सौ. रसिका राजेंद्र कुशे यांना कमळ चिन्हावर उमेदवारी जाहीर करण्यात आली.

तर उर्वरीत १४ जागांवर शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये प्रभाग १ अ मधून सौ. सान्वी सचिन रावण, प्रभाग १ ब मधून सौरभ संजय खडपे, प्रभाग २ अ मधून दिलीप दिवाकर चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

प्रभाग ३ अ मधून सौ. आरती गणेश जाधव तर प्रभाग ३ ब मधून दिपक विनायक गुरव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. प्रभाग ४ ब मधून दिलीप अमरे यांना तर प्रभाग ५ अ मधून किशोर काशिनाथ जाधव, प्रभाग ५ ब मधून सुमैय्या जिलानी काझी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग ६ ब मधून खलील अहमदहसन सय्यद यांना तर प्रभाग ७ ब मधून असिम साजिद काजी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

प्रभाग ९ अ मधून सौ. नेत्रा निलेश सोगम यांना तर प्रभाग ९ ब मधून संजय पांडुरंग ओगले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर प्रभाग १० अ मधून सौरभ पेणकर यांना तर प्रभाग १० ब मधून साजिया हनिफ काझी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरीत चार जागांचे उमेदवार शनिवारी सायंकाळपर्यंत जाहीर करण्यात येणार असून सर्व उमेदवार सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

यावेळी आमदार किरण सामंत यांसह भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष एड. दिपक पटवर्धन, अविनाश लाड, भाजपाच्या प्रदेश महिला सरचिटणीस सौ. शिल्पा मराठे, सचिन वहाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बंटी वणजू, अमित केतकर, शिवसेना जिल्हा संघटक अशफाक हाजू, प्रकाश कुवळेकर, शिवसेना तालुकाप्रमुख दिपक नागले, रिपब्लीकन सेनेचे अनिरूध्द कांबळे, प्रशांत कदम आदींसह महायुतीचे जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थीत होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, एड. दिपक पटवर्धन, अविनाश लाड, बंटी वणजू यांनी मनोगत व्यक्त करून महायुतीतर्फे एक दिलाने ही निवडणूक लढवत असल्याचे सांगून या राजापूर नगर परिषद आणि लांजा नगर पंचायतीत महायुती दणदणीत विजय मिळविल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी महायुतीतर्फे राजापूर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झालेल्या सौ. श्रृती ताम्हनकर यांनी आपल्या विजयाबद्दल ठाम आत्मविश्वास व्यक्त करताना या नगराध्यक्षपदाची मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा निर्धार व्यक्त केला.