खेड (प्रतिनिधी) – खेड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मधून युतीचे उमेदवार सौ. आरती महेंद्र पवार व श्री. यश खेडेकर यांनी आपले निवडणूक नामनिर्देशन पत्र रविवार 16 नोव्हेंबर रोजी विधिवत दाखल केले. खेड नगरपरिषद कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन्ही उमेदवारांसोबत प्रभागातील सर्व आजी–माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
अर्ज दाखल करण्याच्या वेळी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. समर्थकांची घोषणाबाजी, शुभेच्छांचा वर्षाव आणि उमेदवारांच्या विजयाबद्दलचा आत्मविश्वास यामुळे संपूर्ण वातावरण रंगतदार झाले. प्रभाग क्रमांक ५ मध्ये विकासकामांना गती देणे, मूलभूत सुविधांचा विस्तार आणि लोकसहभाग वाढवणे या प्रमुख मुद्द्यांवर दोन्ही उमेदवारांनी भविष्यात काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिकांनी युतीच्या उमेदवारांवर ठेवलेला विश्वास आणि दाखवलेली उपस्थिती पाहता आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मध्ये चुरस वाढण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना मिळालेल्या मोठ्या पाठिंब्याबद्दल सौ. आरती पवार आणि श्री. यश खेडेकर यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.
खेड नगरपरिषद निवडणुकीची रंगत वाढत असून प्रभाग ५ मधील या उमेदवारी अर्जामुळे युतीची निवडणूक लढाई आणखी मजबूत झाल्याचे चित्र आहे.













