सावंतवाडीत महाराष्ट्र लोकाधिकार समितीची ‘शेती वाचवा, शेतकरी जगवा’ स्वाक्षरी मोहीम 

वन्य प्राण्यांच्या त्रासावर तातडीच्या उपाययोजनांची मागणी

सावंतवाडी । प्रतिनिधी : जंगली प्राण्यांमुळे शेतातील पिकांचे होणारे अतोनात नुकसान थांबवण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी करत महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडून ‘शेती वाचवा, शेतकरी जगवा’ या घोषणेखाली सावंतवाडी येथील बस स्थानकासमोर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी यावेळी बोलताना, वन्य प्राण्यांचा उच्छाद संपवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे आवाहन केले आहे.

ॲड. करंदीकर म्हणाले की, आपल्या देशात शेती हा मुख्य व्यवसाय असून बहुसंख्य जनतेचे उत्पन्न त्यावर अवलंबून आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत वन्य प्राण्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गवे-रेडे, हत्ती, माकडे, रानडुक्कर इत्यादी वन्य प्राण्यांमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी दिवस-रात्र मेहनत करून पिके लावतात, खत-पाणी घालतात, पण या प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे अनेकदा संपूर्ण पिके उध्वस्त होताना दिसून येत आहेत. त्यामुळे शेती आणि बागायती व्यवसाय पूर्णतः धोक्यात आला आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके गवे-रेडे आणि हत्ती तुडवून नासधूस करतात, तर माकडांची टोळकी फळे आणि भाज्या नष्ट करतात. हत्ती आणि गवे यांच्या हल्ल्यात तर शेतकऱ्यांची घरेही सुरक्षित राहत नाहीत. जुत्ररसारख्या ठिकाणी बिबटे नरभक्षक झाल्याने नवे संकट उभे राहिले असून, शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीविताचीच सुरक्षितता धोक्यात आली आहे. जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्यांवर गळ्यात लोखंडी खिळे असलेले पट्टे घालून वावरण्याची पाळी आली आहे. या त्रासामुळे शेतकऱ्याची तहानभूक आणि झोप हरपून त्याचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्यही धोक्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले.

तसेच, वन्यजीवांचे संरक्षण महत्त्वाचे असले तरी शेतकऱ्याला वाचवणे आणि त्याला जगवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यातील किचकट तरतुदींमुळे शेतकऱ्यांना काहीच उपाय करता येत नाहीत, त्यामुळे त्यांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. ‘शेतकरी वाचला तरच देश वाचेल,’ म्हणून जंगली जनावरांच्या त्रासावर तातडीने ठोस उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सरकारने तातडीने नुकसान भरपाईची प्रक्रिया सुलभ करावी, सोलर फेंसिंग जाळी व इतर संरक्षणात्मक साधनांसाठी तरतूद करावी अथवा अनुदान द्यावे, तसेच वनखात्याच्या पथकांना तातडीने घटनास्थळी पाठवण्याची यंत्रणा उभी करावी, अशी मागणी त्यांनी केली. स्थानिक ग्रामपंचायती, वनविभाग आणि नागरिकांची समिती नेमून शेतकरी आणि वन्यप्राणी यांच्यातील संतुलन राखण्यासाठी उपाययोजना करावी. त्यातून मजबूत सौर/विद्युत कुंपण व्यवस्था, वन्य प्राण्यांच्या हालचालीचे वैज्ञानिक मॅपिंग आणि जलस्त्रोत व अन्नाचे क्षेत्र नियोजन आदी उपाय तातडीने व प्रभावीपणे राबवले जाणे आजची गरज आहे. शेतकऱ्यांच्या वेदनेला आवाज देत शाश्वत उपायांच्या दिशेने वाटचाल व्हावी यासाठी समिती शेतकऱ्यांसोबत पूर्ण ताकदीने उभी राहील, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर, विवेक नाईक, संजय पवार, प्रसाद नाईक आदी उपस्थित होते.