पूर्ये तर्फे देवळे परिसरातील १०० वृद्धांना मिळाली ‘काठी’ची भेट

प्रकाश माने यांचे २२ वर्षांपासूनचे समाजकार्य स्तुत्य!

शंकर वैद्य | साखरपा : ‘ज्या समाजात आपण जन्माला आलो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो,’ या उदात्त भावनेतून समाजास मदत करण्याची इच्छा असल्यास, तो व्यक्ती नेहमीच समाजासाठी काही ना काही देत असतो. याच भावनेतून संगमेश्वर तालुक्यातील पूर्ये तर्फे देवळे, राववाडी येथील दानशूर व्यक्ती श्री. प्रकाश माने हे गेल्या २२ वर्षांपासून सातत्याने विद्यार्थी, वृद्ध आणि गरीब महिलांना त्यांच्या उपयोगाच्या वस्तूंचे वाटप करून निःस्वार्थ समाजकार्य करत आहेत.

आपल्या समाजकार्याची परंपरा कायम ठेवत, श्री. प्रकाश माने यांनी नुकतेच परिसरातील शंभर (१००) वृद्धांना व्यवस्थित चालता यावे यासाठी काठी आणि डोक्याचे ऊन व थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून टोपी वाटप केली. यामुळे वृद्धांना मोठा आधार मिळाला आहे. यापूर्वी त्यांनी परिसरातील वृद्ध ग्रामस्थांना नी-कॅप (गुडघ्यासाठी), गरम पाण्याची पिशवी, जेंट्स बॅग आणि टोपीचे वाटप केले होते.

यासोबतच पंचक्रोशीतील शाळांमध्ये गरीब घरातील आणि आई-वडील नसलेल्या अनेक गरजू मुलांना स्कूल बॅग (दप्तरं), वह्या, शालेय पुस्तके, पेन, पेन्सिल, पाउच अशा प्रकारचे अत्यंत आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरवले आहे. विशेष म्हणजे, दिवाळी सणामध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी मिठाईचे वाटप देखील ते आवर्जून करतात. या महान कार्याबद्दल बोलताना श्री. प्रकाश माने यांनी ‘असे कार्य केल्यामुळे मला खूप समाधान मिळते,’ अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि अमूल्य समाजकार्याचे पंचक्रोशीतील सर्व स्तरांतून खूप कौतुक होत आहे.