सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या उमेदवारांना खर्च सादर करण्याबाबत प्रशिक्षण

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरपरिषद सदस्य पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक खर्चाच्या हिशोबाचा तपशील सादर करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार श्रीधर पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या निर्देशानुसार नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या प्रशिक्षणास उपस्थित नगराध्यक्ष व सदस्य पदाचे उमेदवार, तसेच त्यांचे प्रतिनिधी यांना उपकोषागार अधिकारी, सावंतवाडीचे मंदार पटवर्धन आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे लेखापाल प्रसाद बटवाल यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी निवडणुकीसाठी येणाऱ्या जमाखर्चाचा हिशोब आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विहित नमुन्यामध्ये कसा सादर करायचा, याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी उमेदवार व प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही करण्यात आले. या प्रशिक्षणाला उमेदवार तसेच उमेदवार प्रतिनिधी उपस्थित होते

.