राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय भरारी पथकाची धडक मोहीम
रत्नागिरी : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान रोखणे आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी शहरात जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने धडक तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा (कोटपा) २००३ अंतर्गत १६ टपरीधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण २ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई १४ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास प्रतिबंध करणे, तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवणे, अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखणे आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अशा पदार्थांच्या विक्रीला आळा घालणे, हा मोहिमेचा प्रमुख उद्देश होता.
कोटपा कायद्याच्या उल्लंघनावर दंडात्मक कारवाई
कोटपा कायदा २००३ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास प्रतिबंध असून, उल्लंघन केल्यास २०० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिरातींवरही कायद्याने निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच १८ वर्षांखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे आणि शैक्षणिक संस्थेच्या हद्दीपासून १०० यार्ड परिसरात अशा पदार्थांची विक्री करणे प्रतिबंधित आहे. या तरतुदींचे उल्लंघन केल्यास संबंधित कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाते.
या कारवाईत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती घरत, सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अनिल गुंजे, शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदार रश्मी वायंगणकर आणि होमगार्ड मयूर पाडावकर यांचा समावेश होता.
तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोगासह विविध गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये आणि तंबाखू नियंत्रण कायद्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.












