संगमेश्वर: मौजे- कोंडीवरे, ता. संगमेश्वर येथील कणकीचे सपाट परिसरात साबुदाणा बागेच्या कंपाऊंडला लावलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून दोन रानकुत्रे (कोळसुंदे) मृत झाल्याची घटना १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी वन विभागाने गुन्हा नोंद करून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
कोंडीवरे येथील श्री. दिनेश राजाराम कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, जागेवर वन्यप्राणी आढळले नाहीत. त्यानंतर साबुदाणा बागेची देखरेख करणाऱ्या इसमाकडे चौकशी केली असता, त्यांनी मृत रानकुत्रे उचलून बागेतच खड्डा खोदून पुरल्याचे ठिकाण दाखवले.
वनविभागाने तातडीने तो खड्डा उकरला असता, त्यामध्ये रानकुत्र्याची एक मादी आणि एक नर असे दोन मृत वन्यप्राणी आढळून आले. हे दोन्ही मृत प्राणी पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले.
या घटनेप्रकरणी संशयित आरोपी म्हणून जॉर्ज.पी.व्ही (मूळ गाव- कन्नूर, केरळ) आणि घनश्याम (मूळ गाव- लखिमपूर, उत्तर प्रदेश, दोघे सध्या राहणार कोंडीवरे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांना वन विभागाने पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
वन विभागाने शेती संरक्षणासाठी वापरलेली तार, झटका मशीन, बॅटरी, वायर, चिमटा वायर आणि फावडा हे साहित्य जप्त केले आहे.
वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये वनपाल संगमेश्वर (देवरुख) यांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून आवश्यक कागदपत्रे तयार करून पुढील तपास सुरू आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शेटे, डॉ. बेलुरे, डॉ. सोनाली शेटे यांच्याकडून मृत प्राण्यांची तपासणी करून शवविच्छेदन करून घेण्यात आले.
सदरची कारवाई माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईसाठी श्री. प्रकाश सुतार (परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी), श्री. सागर गोसावी (वनपाल संगमेश्वर-देवरुख), वनरक्षक श्री. सुरज तेली, आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे यांनी सहभाग घेतला. त्यांना पोलीस पाटील कोंडीवरे राजेंद्र मेणे, दिनेश गुरव, झाकिर शेकासन, अंकित कदम, विजय कदम यांचे सहकार्य लाभले.












