मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नेमळे गावात दोन वनराई बंधारे पूर्ण

जलसंधारणाला बळकटी : 

सावंतवाडी । प्रतिनिधी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातर्गत नेमळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत दिनांक २५ नोव्हेंबर रोजी दोन नवीन वनराई बंधारे उभारण्यात आले. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे गावातील जलसंधारणाच्या कामांना मोठी गती मिळाली असून, भविष्यात भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सावंतवाडी येथील मान्यवर अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गटविकास अधिकारी, पंचायत समिती सावंतवाडी येथील वासुदेव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वनराई बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले. त्यांच्यासोबत सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश जाधव, विस्तार अधिकारी श्री. सावंत आणि श्री. शेळके यांनी मार्गदर्शन केले.

या जलसंधारण कार्यात कृषी अधिकारी श्रीमती. सावंत आणि श्रीमती. नाडेकर यांनी तांत्रिक सहकार्य पुरवले. ग्रामपंचायत नेमळेच्या सरपंच श्रीमती. दिपीका भैरे आणि उपसरपंच श्री. राऊळ यांनी पुढाकार घेऊन हे काम यशस्वी केले. यावेळी ग्रामपंचायत सभासद श्री. एकनाथ राऊळ आणि श्री. सागर नेमळेकर उपस्थित होते. तसेच, माजी उपसरपंच श्री. विक्रम पांगम, ग्रामपंचायत अधिकारी विनोद चौहान, ग्रामपंचायत लिपिक राजाराम गवस, ग्रा.प. कर्मचारी श्रीमती. प्रतिक्षा सावंत व प्रथमेश गावडे तसेच गावातील वार्ताहर श्री. राऊळ आणि नेमळे गावातील असंख्य ग्रामस्थ या कार्यासाठी श्रमदान करण्यास उपस्थित होते.

सरपंच श्रीमती. भैरे यांनी अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. हे वनराई बंधारे बांधल्यामुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरण्यास मदत होणार असून, नेमळे गावाच्या जलसुरक्षिततेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.