घरगुती वादातून पत्नीवर हल्ला; पतीविरोधात गुन्हा दाखल

खेड: तालुक्यातील चिंचवली चव्हाणवाडी येथील रहिवासी विजय रघुनाथ चिंचविलकर यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने गंभीर आरोप करत खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता ही घटना घडली. तक्रारदार विजया विजय चिंचविलकर या त्यांच्या चिंचवली चव्हाणवाडी येथील राहत्या घरी बेडरूममध्ये असताना, पती विजय, मोठा दीर रंजित तसेच मुले आणि इतर कुटुंबीय गप्पा मारत बसले होते. यावेळी पती विजय रघुनाथ चिंचविलकर यांनी दारूच्या नशेत पत्नी विजयाच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, आणि विजय याने बेडरूममध्ये ठेवलेला बसायचा पाट घेऊन विजयाच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात विजया चिंचविलकर जखमी झाल्या. या घटनेनंतर विजया यांनी तातडीने खेड पोलीस ठाणे गाठले आणि पतीविरोधात तक्रार दिली.

या तक्रारीवरून २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.४८ वाजता विजय रघुनाथ चिंचविलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.