चिपळूण नगर परिषद प्रभाग ६ ते १० प्रभागातील जनतेचा कौल कोणाच्या पथ्यावर!

लढती होणार चुरशीच्या

चिपळूण (संतोष सावर्डेकर):-
चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक रिंगणात उतरलेल्या सर्वच उमेदवारांनी आता घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. मात्र, निवडणुकीसाठी मिळालेला कालावधी पाहता उमेदवारांची दमछाक होताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक ६ ते १४ प्रभागातील उमेदवार प्रचारात गुंतली असून आपले नशीब अजमावण्यासाठी धडपड करीत आहेत.

प्रभाग क्रमांक ६ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित असून या प्रभागातून काँग्रेसतर्फे त्रिशा घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे समिधा जोगळे, भाजपा तर्फे वैशाली नेमकर तर अपक्ष म्हणून साक्षी लोटेकर निवडणूक रिंगणात आहेत. वैशाली निमकर या भाजपाच्या गेल्या काही वर्षांपासून सक्रिय कार्यकर्त्या असून भाजपातील महत्त्वाची पदे देखील भूषवून पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत याची दखल घेऊन भाजपाने वैशाली निमकर यांना प्रभाग क्रमांक सहा अ मधून उमेदवारीची संधी दिली आहे. प्रभाग क्रमांक ६ ब सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असून या प्रभागात पंचरंगी लढत होणार आहे. काँग्रेस तर्फे इम्तियाज कडू, शिवसेना उबाठा लतर्फे संजय गोताड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नियाज पाते, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून बरकत पाते, शिवसेनेकडून विष्णू लाणे निवडणूक रिंगणात आहेत.

प्रभाग क्रमांक ७ अ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तरुण कार्यकर्ते राहुल कांबळी, काँग्रेसतर्फे किशोर जागुष्ठे , भाजपातर्फे संदीप भिसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून सुनील रेडीज, शिवसेना उबाठा पक्षाकडून राहुल लोटेकर निवडणूक रिंगणात असून भाजपाचे संदीप भिसे तरुण कार्यकर्ते या निवडणूक रिंगणात आपले नजीक नशीब आजमावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील रेडीज यापूर्वी देखील निवडणुका लढले आहेत. मात्र, यश मिळाले नाही .यावेळी ते यशस्वी होतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्रमांक ७ ब सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून या प्रभागात तिरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून सुप्रिया जाधव, शिवसेना उबाठा पक्षाकडून सपना पवार ,शिवसेनेकडून हर्षाली पवार ,निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

प्रभाग क्रमांक ८ अ सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून या प्रभागातून शिवसेनेकडून विशाखा उतेकर, शिवसेना पक्षाकडून फिरदोस कवारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नगमा रियाने, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून शैनाज वांगडे तर अपक्ष म्हणून नम्रता उदेग निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. प्रभाग क्रमांक ८ ब सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असून शिवसेना उबाठाकडून सचिन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राजेश केळसकर, काँग्रेसकडून निर्मला जाधव, शिवसेनेकडून धीरज नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून योगेश पवार निवडणूक रिंगणात उतरले असून शिवसेना उबाठा पक्षाचे सचिन कदम यांनी यापूर्वी निवडणुका लढवल्या आहेत. मात्र, त्यांना यश आलेले नाही. तर यापूर्वी राजेश केळकर यांनी अपक्ष निवडणूक लढवत या संपादन केले होते. योगेश पवार यांना देखील यापूर्वी यश आलेले नाही. यामुळे या प्रभागातून विजय मिळवण्यासाठी सर्वांची कसोटी पणाला लागलेली आहे.

प्रभाग क्रमांक ९ अ मधून भाजपाकडून अंजली कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आदिती देशपांडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून साक्षी शिंदे निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. प्रभाग क्रमांक ९ ब सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असून शिवसेना उबाठा पक्षाकडून सुनील कुलकर्णी, भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार परिमल भोसले, भाजपाचे चिपळूण शहराध्यक्ष शशिकांत मोदी, भाजपचे चिपळूण माजी शहराध्यक्ष श्रीराम शिंदे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे शशिकांत मोदी यांनी यापूर्वी हॅट्रिक केली असून आता चौकार मारण्याच्या तयारीत आहेत.

प्रभाग क्रमांक १० अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून मनाली जाधव, शिवसेना उबाठा पक्षाकडून सानिका टाकळे, भाजपाकडून रसिका देवळेकर ,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नुपूर बाचीम, प्रभाग क्रमांक १० ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजय कांबळी, शिवसेनेकडून विक्रांत शिर्के , काँग्रेसकडून अजित शिंदे निवडणूक रिंगणात उतरले असून हे सर्वजण आपले नशीब आजमावू पाहत आहेत.