सूचना व तक्रारी जाणून घेण्यासाठी दर महिन्याला घेणार जनता दरबार : वेंगुर्ले मध्ये शिवसेनेचा जाहीरनामा 

प्रामाणिकपणा सेवा आणि विकास हेच आमचं राजकारण : सचिन वालावलकर

वेंगुर्ले l दाजी नाईक :प्रामाणिकपणा सेवा आणि विकास हेच आमचं राजकारण. वेंगुर्ल्याचा विकास हाच आहे शिवसेनेचा विश्वास. याच तत्वाखाली आम्ही वेंगुर्ले शहरात काम करत असून पुढेही हे काम असेच अविरत सुरू राहील. वेंगुर्ला नगरपरिषदेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आल्यानंतर नागरिकांच्या सूचना व तक्रारी जाणून घेण्यासाठी दर महिन्याला जनता दरबाराचे आयोजन करणार आहेत. तसेच समस्यांचे त्वरित निवार करण्यासाठी विभागनिहाय समित्या कार्यरत केल्या जातील अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी आज जाहीरनामा प्रकाशन प्रसंगी दिली.

वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. याचे प्रकाशन आज गुरूवारी शिवसेनेच्या कार्यालयात जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर, तालुका संघटक बाळा दळवी, युवासेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, महिला तालुकाप्रमुख शितल साळगावकर यांच्यासह नगराध्यक्षपदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे आणि २० ही नगरसेवकपदाचे उमेदवार उपस्थित होते.

जाहीरनाम्या बाबत माहिती देताना श्री. वालावलकर म्हणाले की, आम्ही आजपर्यंत वेंगुर्ले शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून शिवसेने तर्फे आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकास कामांची माहिती प्रत्येक विकास कामाच्या नाव आणि निधी सह पुस्तक स्वरूपात नागरिकांच्या हातात दिली आहे. आता पुढे आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर आम्हाला नेमकं काय करायचं आहे हे आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून मांडत आहोत.

वेंगुर्ले शहरातील आरक्षित जागांवरील सर्व विकास प्रकल्पांना गती देऊन शहराच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येईल. नागरिकांना सोयीस्कर पायाभूत सुविध व स्वच्छ, सुबक वेंगुर्ला घडविणे हे आमचे ध्येय आहे. शासकीय योजनांतर्गत उभारलेले रिसॉर्ट विकसित करून ते स्थानिक युवकांना भाडेतत्त्वावर देण्यात येतील, ज्यातून स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळेल. बंदर रोडवर समुद्राकडे जाणारा नऊ मीटर रूंदीचा पूल बांधण्यात येईल. पुलाखाली वाणिज्य गाळे तयार करून मच्छिमार बांधव व महिला बचत गटांना अल्प भाड्याने देण्यात येतील. पर्यटन वृद्धीसाठी निशाण तलाव नजिक अद्ययावत असे सुसज्ज वॉटर पार्क, कॅम्प येथील आरक्षित जागेवर सुसज्ज ट्रामा केअर सेंटर आणि कायमस्वरूपी डायलेसिस सेंटर उभारले जाणार आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून तिलारीचे पाणी अल्प दरात नागरिकांना उपलब्ध करून दिले जाईल. नारायण तलावाचे पुनरूज्जीवन करून पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले असून दुस-या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम पूर्ण झाल्यावर शहरातील पाणी पुरवठ्याचे सुयोग्य नियोजन करून दाभोसवाडा, गिरपवाडा, बंदर परिसर, कलानगर या भागातील नागरिक तसेच मच्छिमार बांधवांसाठी पाण्याच्या समस्यांचे कायमस्वरूपी निवारण होणार असल्याचे सचिन वालावलकर यांनी सांगितले.