खेड: – गेली चार वर्षे बंद असलेल्या खेड नगर परिषद दवाखान्याच्या पुनरुज्जीवनाासाठी नागरिकांच्या समस्या सातत्याने पुढे मांडणारे सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी पुन्हा एकदा ८ डिसेंबर २०२५ रोजी खेड नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात दिले असून, दवाखाना तात्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी याद्वारे केली आहे.
खेड नगरपरिषद हद्दीत असलेला दवाखाना गेल्या चार वर्षांपासून बंद असल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी प्रचंड गैरसोय निर्माण झाली आहे. पूर्वी या दवाखान्यात रुग्णांना औषधोपचारासह मूलभूत वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होत होत्या. मात्र, दवाखाना बंद पडल्याने वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत, औषधांची टंचाई आहे आणि अत्यावश्यक उपचारांसाठीही रुग्णांना बाहेर धावपळ करावी लागत आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मंगेश मोरे यांनी यापूर्वीही या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ७ जुलै ते १० जुलै २०२५ या कालावधीत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. त्या वेळी प्रशासनाकडून त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले होते की दवाखाना पुन्हा सुरू केला जाईल आणि आवश्यक पत्रव्यवहार कोल्हापूर मंडळाशी करण्यात आलेला होता. या आश्वासनानंतर १२ जुलै २०२५ रोजी दवाखाना पुन्हा सुरू झाला मात्र काही महिन्यांतच, ऑक्टोबर २०२५ पासून दवाखाना पुन्हा बंद झाल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर दवाखाना तातडीने सुरू करणे, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे आणि सामान्य नागरिकांच्या गैरसोयीचा अंत करणे या मागण्यांसाठी मोरे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी दि. २९ नोव्हेंबर रोजी नगरपरिषदेला याबाबत लेखी निवेदन दिले होते. आता दवाखाना सुरू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी ८ डिसेंबर रोजी ते आमरण उपोषणास बसणार असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या सोबत आणखी चार नागरिकही उपोषणात सहभागी होणार असल्याचे निवेदनात नमूद आहे.
दवाखाना बंद असल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांच्या अनेक तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचत असताना, आता मोरे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे नगरपरिषदेवर दवाखान्याच्या समस्येवर कोणती उपाययोजना प्रशासनाद्वारे केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.












