रामदास कदम यांच्या उपस्थितीत सलामीचा सोहळा संपन्न
खेड (प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे येथील कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी काळकाई मंदिर येथे यंदाचा शिमगोत्सव विशेष ठरला. नवरात्रोत्सव आणि शिमगा उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे देवीला पोलीस दलामार्फत शासकीय सलामी देण्यात आली. मात्र यावर्षीची सलामी अनेक कारणांनी वेगळी आणि लक्षवेधी ठरली.
खेडचे सुपुत्र आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री सचिवालयात सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर काही वर्षांपूर्वी श्री देवी काळकाई मातेला शासकीय सलामी सुरू झाली होती. यंदाच्या शिमगोत्सवात या सलामीच्या वेळी स्वतः रामदास कदम उपस्थित राहिल्याने सोहळ्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.
यंदाच्या शिमगोत्सवाची सुरुवात चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर झाली. कोकणातील अनेक ठिकाणी ग्रहणाचा कालावधी सुरू होण्यापूर्वी होम-हवन पार पडले, तर ग्रहण संपल्यानंतर देवींच्या पालख्या मंदिरातून बाहेर पडल्या. धार्मिक विधी आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात उत्सवाचे वातावरण भक्तीमय झाले होते.
शिमगोत्सवानिमित्त कोकणात दाखल झालेले रामदास कदम मंगळवारी रात्री सपत्नीक भरणे येथे दाखल झाले. त्यांनी श्री देवी काळकाई मातेचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करत, “आपल्यामुळेच शासकीय सलामी सुरू झाली आहे, त्यामुळे आपण सलामी होईपर्यंत थांबावे,” असा आग्रह धरला. ग्रामस्थांच्या विनंतीला मान देत रामदास कदम यांनी शासकीय सलामीच्या सोहळ्यास उपस्थिती लावली.
पोलीस दलाच्या तुकडीने दिलेल्या शासकीय सलामीने वातावरण भारावून गेले. सलामी संपल्यानंतर रामदास कदम यांनी कोकणवासियांना शिमगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि कोकणच्या परंपरा व श्रद्धेचे जतन करण्याचे आवाहन केले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, सचिन धाडवे, उद्योजक शैलेश कदम यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी, भरणे ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तीभाव, परंपरा आणि राजकीय उपस्थिती यांचा संगम साधणारा हा शासकीय सलामीचा सोहळा यंदाच्या शिमगोत्सवातील विशेष आकर्षण ठरला.













