दुर्मीळ स्थलांतरित बदकांचे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता

देवगड :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल येथील पाणथळ भागात 06 आणि 07 डिसेंबर 2025 रोजी विदेशातून स्थलांतर करून आलेल्या हिवाळी जलपक्ष्यांचे दर्शन झाल्याची नोंद समोर आली आहे. थंड हवामानापासून आश्रय शोधत हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या या पक्ष्यांमुळे परिसरातील जैवविविधतेची श्रीमंती पुन्हा अधोरेखित झाली आहे.
स्थानिक पाणथळ पट्ट्यात दिसून आलेल्या प्रमुख प्रजातींमध्ये Ruddy Shelduck (female), Eurasian/Green-winged Teal, Northern Shoveler (female) आणि Mallard (female) या दुर्मीळ व सुंदर जलपक्ष्यांचा समावेश आहे. रशिया, चीन, सायबेरिया, मध्य आशिया आणि युरोप या थंड प्रदेशांतील प्रजननक्षेत्रांमधून दरवर्षी हिवाळ्यात भारतात येणाऱ्या या प्रजाती सिंधुदुर्गात प्रथमच किंवा अत्यंत क्वचित दिसतात, त्यामुळे या नोंदी विशेष महत्त्वाच्या ठरतात.
पडेल परिसरातील दलदली जमीनीचा ताजेपणा, चिखलयुक्त किनारे, उथळ पाणथळ भाग आणि तुलनेने कमी प्रदूषणामुळे हे क्षेत्र स्थलांतरित जलपक्ष्यांसाठी उपयुक्त आश्रयस्थान ठरत असल्याचे पक्षीनिरीक्षकांचे मत आहे. योग्य अन्नस्रोत, सुरक्षित विश्रांती स्थळे आणि शांत परिसर या प्रजातींच्या आगमनामागील प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
या दुर्लभ पक्ष्यांची छायाचित्रे निसर्ग आणि पक्षी निरीक्षणाची आवड असलेल्या कु. सारा संजय गांवकर हिने टिपली असून, तिच्या निरीक्षणांमुळे या भागातील पक्षीजैवविविधतेचे नवे दस्तऐवजीकरण पुढे येत आहे. स्थानिक निसर्गप्रेमी व पर्यावरण अभ्यासकांनी या नोंदी अत्यंत मौल्यवान असल्याचे मत व्यक्त केले आहे.
स्थलांतरित पक्ष्यांची उपस्थिती म्हणजे त्या परिसरातील पाणथळ अधिवास अजूनही सुरक्षित, जैवविविधतेला पोषक आणि प्रदूषणापासून मोठ्या प्रमाणात मुक्त असल्याचा सकारात्मक संकेत आहे. मात्र अशा संवेदनशील अधिवासांचे संरक्षण करणे, पाणथळ भागात प्लास्टिक किंवा रासायनिक घाण होऊ न देणे आणि परिसरातील मानवी अतिक्रमण टाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले आहे.
निसर्गप्रेमी आणि पक्षीनिरीक्षकांसाठी पडेल येथील हे अप्रतिम निरीक्षण विशेष आनंददायी ठरले असून, स्थलांतरित जलपक्ष्यांचा हा हिवाळी मेळा सिंधुदुर्गच्या परिसंस्थेतील समृद्धीचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.












