इस्रोच्या समस्येवर जीआयटीच्या विद्यार्थ्यांचा अभिनव उपाय; ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२५’च्या ग्रँड फिनालेत भक्कम मजल

खेड: घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (GIT) येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२५ (SIH 2025) मध्ये भक्कम उपस्थिती नोंदवली आहे. अहमदाबाद येथे पार पडलेल्या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये सहभागी होण्याचा मान या संघाला मिळाला असून, संपूर्ण महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.
देशभरातून तब्बल ३५० पेक्षा अधिक प्रकल्पांची नोंदणी झाली होती. अत्यंत कठोर परीक्षणानंतर त्यातील केवळ पाच उत्कृष्ट संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. या निवडक संघांमध्ये GIT चा संघ असल्याने महाविद्यालयाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव वाढला आहे.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने दिलेल्या अत्यंत जटिल आणि आव्हानात्मक समस्येवर काम केले. कोणत्याही विशेष हार्डवेअर अथवा सेन्सर वापरल्याशिवाय टक्कर ओळखता येईल असा तांत्रिक उपाय विद्यार्थ्यांनी विकसित केला आहे. त्यांच्या या नाविन्यपूर्ण आणि खर्चिकदृष्ट्या उपयुक्त संकल्पनेचे परीक्षकांनी भरभरून कौतुक केले.
सिद्धांत जाकिणकर या विद्यार्थ्याने संघाचे नेतृत्व केले. संघात मल्हार कुलकर्णी, समर्थ दावंडे, विकास मन्हींदे, भावेश पाटील आणि सई दळवी या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या प्रकल्पासाठी एआयएमएल विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रतीक ओक यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण कष्टांमुळे व तांत्रिक तयारीमुळे ८ आणि ९ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या ग्रँड फिनालेत त्यांची कामगिरी विशेष ठरली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील आणि रजिस्ट्रार प्रा. संदीप मुनघाटे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
स्मार्ट इंडिया हॅकाथॉनमुळे GIT चे नाव राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाल्याने विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शकांचे आणि महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.